हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने पुणेकरांना खास भेट दिली आहे. पुण्यातील सार्वजनिक वाहतूक मजबूत करण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने १,००० इलेक्ट्रिक बसेसना (Pune E-Buses) मंजुरी दिली आहे. पीएम ई-ड्राइव्ह योजनेअंतर्गत या इलेक्ट्रिक बसेस पुणेकरांना देण्यात येतील. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत माहिती दिली आहे.
या नवीन इलेक्ट्रिक बसेस मुळे (Pune E-Buses) पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक नेटवर्कला मोठा चालना मिळेल. नवीन ई-बसच्या समावेशामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) च्या ताफ्याला बळकटी मिळेल, गर्दी कमी होईल आणि वाहनांचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, मोहोळ यांनी एका निवेदनात म्हंटल. मोहोळ म्हणाले की, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाअंतर्गत शहर, पिंपरी चिंचवड आणि लगतच्या भागात बस सेवा चालवणाऱ्या पीएमपीएमएलने सादर केलेल्या प्रस्तावाला केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी अंतिम मान्यता दिली आहे.
पीएमपीएमएल २००० बसेस चालवते- Pune E-Buses
पीएमपीएमएल सध्या सुमारे २००० बसेस चालवते, त्यापैकी सुमारे ७५० बसेस त्यांच्या मालकीच्या आहेत आणि उर्वरित कंत्राटदारांमार्फत चालवल्या जातात. अधिकाऱ्यांच्या मते, शहराचा विस्तार झपाट्याने होत असल्याने, प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रकल्पाला किमान ३,००० बसेसची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर पीएमपीएमएलच्या ताफ्यात नव्या बस दाखल करण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांनी राज्य सरकारसह केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. यासाठी मोहोळ यांनी एच.डी. कुमारस्वामी यांच्या वेळोवेळी प्रयत्न भेटी घेऊन पाठपुरावा केला होता. अखेर या पाठपुराव्याला यश आलं असून केंद्र सरकारने १००० इलेक्ट्रिक बसेसना (Pune E-Buses) मंजुरी दिली आहे.
यासाठी आर्थिक तयारी सुनिश्चित करण्यासाठी, मी मुख्यमंत्री फडणवीस यांना आवश्यक पत्रव्यवहार भारतीय रिझर्व्ह बँकेला पाठवण्याची विनंती केली होती. पीएमपीएमएलने नंतर हा प्रस्ताव केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडे पाठवला. मी सुमारे पंधरा दिवसांपूर्वी नवी दिल्लीत मंत्री कुमारस्वामी यांची भेट घेतली, त्यानंतर मंजुरी जलद करण्यात आली. याशिवाय पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक पायाभूत सुविधा मजबूत करणे हे प्राधान्य आहे, पुणे मेट्रो ३२ किमीच्या नेटवर्कवर धावते आणि शिवाजीनगर-हिंजवडी मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे, इतर विस्तारांनाही मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली. मोहोळ यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, कुमारस्वामी आणि फडणवीस यांचे आभार मानले.




