पुणे | शहरात शुक्रवारी जुना बाजार चौकात होर्डिंग कोसळले होते. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला, तर ८ जण गंभीर जखमी आहेत. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. संजय सिंग आणि पांडुरंग वनारे अशी या दोघांची नावे आहे. संजय सिंग हा रेल्वेमध्ये सेक्शन इंजिनिअर आहे, तर पांडुरंग वनारे हा रेल्वेमध्ये लोहार म्हणून काम करतो. हे दोघे होर्डिंग काढण्याचे काम करत होते. मात्र होर्डिंग वरुन कापण्याऐवजी त्यांनी खालून कापण्यास सुरुवात केली होती.
शुक्रवारी जुना बाजार चौकात रेल्वेच्या जागेमध्ये अनधिकृतपणे उभारण्यात आलेली होर्डिंग्ज काढत असताना ही घटना घडली. रेल्वे प्रशासनाकडून हे होर्डिंग्ज काढण्याचं काम सुरु होतं. मात्र ते करताना होर्डिंग्जचे अँगल्स वरुन कापत येण्याऐवजी खालून कापले जात असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. होर्डिंग पडतेवेळी होर्डिंगखाली असलेली व्यक्ती उठून पळताना दिसते आहे. तो पांडुरंग वनारे आहे.
या होर्डिंगचं कंत्राट मिळालेल्या कंपनीनं करार संपल्यानंतर होर्डिंग काढण्याची परवानगी ५ महिन्यांपूर्वीच मध्य रेल्वे प्रशासनाकडे मागितल्याचा दावा केला आहे.काही दिवसांपूर्वी हे काम सुरु झालं. पण त्यावेळी कर्मचाऱ्यांनी या होर्डिंगला आधार देण्यासाठी लागणारे अँगल कापून काढून ठेवल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यानंतरही या होर्डिंगवर राजकीय फलकबाजी सुरुच राहिली. त्यामुळे झालेल्या अपघाताला आणि त्यात गेलेल्या ४ जणांच्या मृत्यूला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचं दिसत आहे. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख तसंच जखमींना १ लाखाची मदत रेल्वेकडून जाहीर करण्यात आली आहे.