हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Metro । पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सोप्पा होण्यासाठी काही दिवसांपूर्वी स्वारगेट ते कात्रज या नव्या मेट्रोलाईन – १ कामाचे उदघाटन झाले. मेट्रोलाईन – १ या प्रकल्पाअंतर्गत स्वारगेट,मार्केटयार्ड आणि कात्रज हि स्थानके प्रस्थावित होती. आता यामध्ये नव्याने दोन स्थानकाची भर पडली आहे. काही दिवसापूर्वी मुख्यमंत्रांकडे बालाजीनगर आणि बिबवेवाडी येथे मेट्रो स्थानक व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीची देखल घेऊन बालाजीनगर आणि बिबवेवाडी या स्थानकांना मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता पुणे मेट्रोच्या टप्पा – 1 अंतर्गत स्वारगेट – कात्रज मार्गावर बिबवेवाडी आणि बालाजीनगर येथे दोन नवीन स्थानके करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ट्वीट करत दिली आहे.
राज्य सरकारने पुणे मेट्रोच्या (Pune Metro) बिबवेवाडी आणि बालाजीनगर या दोन नव्या स्थानकांना मंजुरी दिल्याने आता स्वारगेट–कात्रज मेट्रो मार्ग एकूण ५ स्थानकांसह विकसित होणार. या स्थानकांमुळे पुणेकरांचा प्रवास सुलभ होईल आणि वाहतूक कोंडी कमी होईल.तसेच या भागातील व्यवसाय, रोजगार आणि पर्यावरणपूरक वाहतूक यांना चालना मिळणार आहे. वाहतूक कोंडीमुळे सध्या पुण्यात नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.तसेच पुण्यातील महत्त्वाचे उधोगधंदे देखील बाहेरच्या शहरात स्थलांतरित होत आहे. याचा गांभीर्याने सरकार विचार करत असून त्याचाच भाग म्हणून या दोन नव्या स्थानकांना मंजुरी देण्यात आली आहे.
स्थानिक व्यवसायांना चालना मिळेल- Pune Metro
बिबवेवाडी आणि बालाजीनगर या नवीन स्थानकामुळे या भागातील रहिवाशांना मेट्रो रेल्वे (Pune Metro) हि अगदी जवळ आणि सहज उपलब्ध होणार आहे. पुण्यातील पूर्व भागातील म्हणजेच कात्रज बिबवेवाडी, पद्मावती या भागातील प्रवासांचा वेळ आणि खर्च कमी होईल. वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढेल. नव्या मेट्रो स्थानकांमुळे स्थानिक व्यवसायांना चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी वाढतील. पर्यावरणपूरक वाहतूक वाढल्याने प्रदूषण कमी होईल. मेट्रोमुळे धनकवडी, बिबवेवाडी आणि बालाजीनगर परिसरातील नागरिकांना स्वारगेट आणि कात्रज येथील प्रवास सोप्पा होईल.




