हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Metro । पुण्यातील प्रवाशांना आनंदाची बातमी आहे. पुण्यातील वाहतूक कोंडी मिटवण्यासाठी काही मार्गावर मेट्रो चालवली जात आहे. आता या मेट्रोचा विस्तार होणार आहे. पुणे मेट्रोला आणखी १२ नवीन सेट मिळणार आहेत. प्रत्येक मेट्रो ट्रेनला ३ डबे असतील. पुणे मेट्रोने टीटागड रेल सिस्टम्स लिमिटेड आणि टीटागड फायरमा यांच्याकडून या १२ ट्रेन सेटसाठी खरेदी ऑर्डर दिली आहे. हे नवीन ट्रेन सेट पूर्णपणे ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत तयार केले जातील आणि विद्यमान रेकप्रमाणेच अॅल्युमिनियमपासून बनवले जातील.
पुणे मेट्रोच्या (Pune Metro) नेटवर्कच्या पीसीएमसी ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज पर्यंत विस्तारीकरणासाठी मंजुरी मिळाल्यानंतर, पीसीएमसी-निगडी मार्गाचे बांधकाम आधीच वेगाने सुरू आहे. स्वारगेट-कात्रज कॉरिडॉरसाठी कंत्राटदार नियुक्त करण्याची निविदा प्रक्रिया देखील लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या दोन आगामी मार्गांवरील कामकाजाला पाठिंबा देण्यासाठी, पुणे मेट्रोला १२ नवीन मेट्रो ट्रेन सेटची आवश्यकता असेल. एकूण सर्व मेट्रो सेट खरेदीचा खर्च ४३०.५३ कोटी रुपये आहे. पुढील ३० महिन्यांत या गाड्यांची डिलिव्हरी टप्प्याटप्प्याने केली जाईल.
नवीन ट्रेन कशा असतील ? Pune Metro
नवीन ऑर्डर केलेले ट्रेन सेट सध्या सेवेत असलेल्या मेट्रो ट्रेन सेटसारखेच असतील. त्या पूर्णपणे वातानुकूलित असतील, त्यामध्ये तुम्हला स्वयंचलित दरवाजे बघायला मिळतील तसेच त्यामध्ये स्वयंचलित घोषणा आणि प्रदर्शन प्रणाली असतील. या १२ नवीन गाड्या जोडल्याने, पुणे मेट्रोच्या (Pune Metro) एकूण ताफ्याचा आकार ४६ पर्यंत वाढेल. यावेळी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितलं कि, पुणे मेट्रोच्या पीसीएमसी ते निगडी या विस्तारित मार्गांसाठी नवीन १२ ट्रेनची ऑर्डर महामेट्रोने दिलेली आहे. यामुळे या विस्तारित मार्गिकेचे बांधकामाचे पूर्ण झाल्यानंतर लगेच मेट्रो सेवा पुरवणे शक्य होणार आहे. यामुळे पीसीएमसी ते निगडी या मार्गातील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.