हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Metro। पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी मागील काही वर्षांपासून पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी अशा २ मेट्रो चालवल्या जात आहेत. पुणेकरांचा सुद्धा मेट्रोला प्रचंड प्रतिसाद मिळत असून यामुळे महत्वाचं म्हणजे वेळेची सुद्धा बचत होताना दिसतेय. आता पुणेकरांसाठी लवकरच एक नवीन मेट्रो ट्रेन सुरु होणार आहे. हि मेट्रो खराडी ते पुणे एअरपोर्टपर्यंत धावेल. त्यामुळे पुणेकरांसाठी विमानतळावर जाणे अधिक सोप्प होईल.
डीपीआरवर काम सुरु – Pune Metro
सध्या पुण्यात हिंजवडी ते शिवाजीनगर आणि खराडी ते खडकवासला अशा २ मेट्रोचे (Pune Metro) काम सुरु आहे, आता खराडी ते पुणे एअरपोर्ट असा मेट्रो मार्ग तयार करण्याचा निर्णय झाला असून त्यासाठी एक डीपीआर तयार करायला सांगितला आहे. अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी दिली. महा मेट्रो आणि पुणे महापालिका सामूहिकरीत्या या डीपीआरवर काम करत आहे. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात मार्गिका क्रमांक 4 – खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला व मार्गिका क्रमांक 4 अ नळस्टॉप – वारजे – माणिकबाग या दोन मार्गिकांना मंजुरी देण्यात आली आहे. या दोन नवीन 31.6 किलोमीटर अंतराच्या दोन विस्तारित मार्गिकांना मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्या मार्गावर एकूण 28 स्थानके विकसित केली जाणार असून यासाठी 9857 कोटी 85 लाख रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. येत्या ५ वर्षात हे काम पूर्ण होईल असं बोललं जात आहे.
पुणेकरांसाठीच्या सर्वंकष वाहतूक आराखड्यातील महत्त्वाचा घटक असलेल्या पुणे मेट्रोच्या विस्तारित मार्गिकांना मान्यता दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुणेकरांच्या वतीने आभार मानतो. यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचेही मी आभार मानतो, असेही मुरलीधर मोहोळ यांनी म्हंटल.




