Pune Metro : मागच्या काही दिवसांपासून पुण्यामधील मेट्रो ही पुणेकरांच्या सार्वजनिक वाहतूक सेवेमधील महत्त्वपूर्ण भाग बनली आहे. पुणे मेट्रोला लोकांची पसंती मिळताना दिसत आहे. असे असताना पुणे मेट्रोच्या संदर्भात एक नवी माहिती समोर आली आहे.
महा मेट्रो रामवाडी ते वनाज आणि रामवाडी ते वाघोली या मार्गाचा विस्तार करण्याच्या योजनेसह पुढे जात आहे, 11 मार्च 2024 रोजी राज्यसरकारने या दोन्ही प्रकल्पांना मान्यता दिली. आता या मेट्रो विस्ताराचा चेंडूं केंद्राच्या गोटात जाऊन पडला आहे. केंद्र सरकारने अद्याप या प्रकल्पाला मंजुरी दिलेली नाही. मंजुरी मिळताच याच्या बांधकामाला सुरुवात होईल अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे.
महामेट्रोने वनाझ ते चांदणी चौक मार्गावरील दोन स्थानकांसाठी आणि रामवाडी ते वाघोली विस्तारातील 11 उन्नत स्टेशन्ससाठी तपशीलवार डिझाईनच्या कामावर लक्ष केंद्रित केले आहे. वनाझ ते चांदणी चौक विस्तार 1.12 किलोमीटर लांबीचा आहे. त्यामध्ये दोन स्थानक कोथरूड बस डेपो आणि चांदणी चौक यांचाही समावेश आहे.
7 ऑगस्ट 2024 रोजी महा मेट्रोने निविदा काढल्या आहेत. मेट्रो स्थानांसाठी सल्लागाराची नियुक्ती ही केली आहे. रामवाडी ते वाघोली आणि वनाज ते चांदणी चौक विस्ताराच्या खांब डिझाईनच्या कामांचा यात समावेश करण्यात आला आहे. रामवाडी ते वाघोली हा भाग 11.36 किलोमीटरचा आहे. यामध्ये विमान नगर खराडी बायपास आणि वाघोली या सह 11स्थानक आहेत एकत्रितपणे हा विस्तार एकूण 13 स्टेशन सह 12.75 किलोमीटर परिसर काबीज करणार आहे या प्रकल्पाचे अंदाजे किंमत 3756.58 कोटी इतकी आहे.
कोणाला होणार फायदा ?
या दोन्ही प्रकल्पांमुळे अहमदनगर रोडवरील रहिवाशांना फायदा होणार आहे. तसेच या भागात काही आयटी पार्क सुद्धा आहेत जसे की इऑन आयटी पार्क आणि मगरपट्टा सिटी त्यामुळे या भागामध्ये नोकरदार वर्गाची रस्त्यांवर मोठी गर्दी असते. विशेषतः ऑफिसच्या वेळेमध्ये इथे ट्रॅफिक जॅम ची समस्या निर्माण होते. तासंतास ट्रॅफिक जाम असते. मात्र जर ही मार्गिका सुरू झाली तर आयटीयन्सना , शिक्षण घेणाऱ्यांना आणि नोकरदार वर्गाला याचा मोठा फायदा होणार आहे. शिवाय ट्रॅफिक पासून सुटकाही मिळणार आहे. याबाबत माहिती देताना मेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांनी सांगितले की वनाज ते रामवाडी मार्गिका विस्तार प्रकल्पामुळे अहमदनगर रोडवरच्या रहिवाशांना फायदा होईल. आयटी कंपन्या आर्थिक आणि शैक्षणिक संस्थांचा प्रवेश वाढेल असे ते म्हणाले.