हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Metro । महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराचा मागच्या काही वर्षात मोठा कायापालट झाला आहे. खास करून पुण्यातील वाहतूक कोंडी मिटवण्यासाठी मेट्रो सेवा सुरु झाल्या आहेत. पुण्यातील अनेक महत्वाच्या मार्गावर मेट्रो धावत असून पुणेकरांचा प्रवास पूर्वीपेक्षा अधिक सुखकर झाला आहे. आता त्यात आणखी भर पडली असून महाराष्ट्र सरकारने पुणे मेट्रोबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यात २ नवीन मेट्रो स्थानके उभारण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. हि दोन्ही स्थानके स्वारगेट ते कात्रज या विस्तारित मार्गिकेवर उभारली जातील. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हि मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी एकूण ६८३.११ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
कुठे उभारणार मेट्रो स्थानके – Pune Metro
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा 2 च्या अंतर्गत स्वारगेट ते कात्रज मार्गिकेवरील ही मेट्रो स्थानके बालाजीनगर आणि बिबवेवाडी याठिकाणी उभारली जातील. खरं तर स्वारगेट ते कात्रज या मेट्रो लाईनवर सुरुवातीला तीनच स्थानकांचा समावेश होता. जवळपास साडेपाच किमी लांबीचे अंतर असल्याने आणि या परिसरातून प्रवास करणाऱ्यांची संख्याही जास्त असल्याने स्वारगेट ते कात्रज मार्गिकेवर आणखी दोन ठिकाणी स्थानके हवीत, अशी आग्रही मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी महामेट्रोकडे केली होती. त्या मागणीला आता यश आल आहे. यामुळे या भागातील नागरिकांसाठी मेट्रो प्रवास अधिक सुलभ होणार आहे. तसेच, सातारा कोल्हापूरला जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडीही मिटेल पुणे मेट्रो टप्पा-२ चा विस्तार (Pune Metro) अधिक कार्यक्षम होऊन पुणेकरांना आधुनिक, जलद आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीचा लाभ मिळणार आहे.
याव्यतिरिक्त, सरकारने कात्रज मेट्रो स्टेशन त्याच्या पूर्वीच्या प्रस्तावित जागेपासून ४७१ मीटर अंतरावर स्थलांतरित करण्यास मंजुरी दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हंटल कि, स्वारगेट ते कात्रज मार्गिकेवरील बालाजीनगर आणि बिबवेवाडी येथे २ स्थानके उभारण्याच्या या निर्णयामुळे शहरातील सर्वात दाट लोकवस्ती असलेल्या बिबवेवाडी आणि धनकवडी येथील रहिवाशांना मेट्रोची सुविधा मिळेल. या निर्णयामुळे पुणे शहरातील दक्षिण भागातील नागरिकांसाठी मेट्रो प्रवास अधिक सोप्पा होईल.
या प्रकल्पासाठी एकूण ६८३.११ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यात पुणे महानगरपालिकेचा 227.42 कोटी रुपयांचा वाटा असून, युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेकडून 341.13 कोटी रुपयांचे कर्ज मिळणार आहे. याशिवाय राज्य शासनाचे दुय्यम कर्ज व व्याजरहित कर्ज यांचा मिळून एकूण खर्च 683.11 कोटी इतका होणार आहे.




