कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील पार्ले, बाबरमाची, सयापुर, यशवंतनगर, शिरवडे येथील शेतकऱ्यांना पुणे – मिरज- लोंढा रेल्वे दुहेरीकरणामध्ये संपादित होणाऱ्या जमिनिचा बाजारभावाच्या पाचपट बागायती जमिनीप्रमाणे मोबदला देण्यात आला आहे. प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते पार्ले येथील शेतकऱ्यांना मोबदल्याच्या चेकचे वाटप करण्यात आले.
यावेळी रेल्वे आंदोलनाचे शेतकरी नेते सचिन नलवडे, प्रकल्प बाधित शेतकरी दिनकर नलवडे, भीकू नलवडे, तुकाराम नलवडे, भीमराव पाटील, रामचंद्र जाधव, संजय नलवडे, तानाजी जाधव, अशोक नलवडे, तानाजी नलवडे, शिवाजी नलवडे, विनोद नलवडे, संतोष नलवडे, सनी नलवडे, सचिन पाटील उपस्थित होते.
गेली तीन वर्षापासून शेतकऱ्यांचा रेल्वे प्रशासना विरोधात लढा सुरु आहे. शेतकऱ्यांना मोबदला न देता रेल्वे विभागाने विविध ठिकाणी कामे सुरु केली होती. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये रेल्वेच्या हद्दिचे खांब उभे केले होते. शेतकऱ्यांची जमीन आमचीच असल्याचा दावा रेल्वे प्रशासन करत होते. यावेळी शेतकऱ्यांना सोबत घेवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तत्कालीन जिल्ह्याध्यक्ष सचिन नलवडे यांना सोबत घेवून शेतकऱ्यांनी मोठा लढा उभा केला. रेल्वेची विना मोबदला सुरु असलेली कामे सचिन नलवडे यांनी बंद केली होती. त्यानंतर तात्कालीन खासदार उदयनराजे भोसले, जिल्ह्याधिकारी श्वेता सिंघल, कराडचे प्रांताधिकारी हिम्मत खराडे, भुसंपादन शाखेचे दिनकर ठोंबरे व रेल्वे अधिकारी यांची शेतकऱ्यांसोबत बैठक होवून शेतकऱ्यांच्या जमीनी सातबाऱ्या प्रमाणे मोजण्याचे ठरले होते.
त्यानुनार कराड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनिची मोजणी करण्यात आली. मोजणीमध्ये रेल्वेच्या प्रस्तावातील जमिनिच्या क्षेत्रफळापेक्षा जास्त जमीन रेल्वेसाठी संपादित होत असल्याचे निदर्शनास आले. आज वरील 5 गावातील सर्व शेतकऱ्यांना वाढीव क्षेत्रासह बागायती जमिनीप्रमाणे बाजारभावाच्या पाचपट मोबदला मिळला आहे. जमिनीला 5 लाख, दीड लाख रुपये गुंठ्याप्रमाणे तर बाधित होणाऱ्या फळ झाडांना पुढील पिक गृहीत धरून मोबदला मिळाला आहे. घर, शेड, विहीर यालाही शासन निर्णयानुसार चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
शेतकऱ्यांचा एकजुटीचा विजय : सचिन नलवडे
शेतकऱ्यांच्या एकजुटीचा हा विजय असून या आंदोलनासाठी विविध गावातील जेष्ठ लोकांनी सहकार्य केले. कराड विमानतळ भुसंपादन अनुभव समोर असल्याने तूटे पर्यन्त न ताणता प्रमुख मागण्या मान्य झाल्याने शेतकऱ्यांनी भुसंपादनास सहमती दिली. शेवटच्या शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत लढा सुरु राहणार आहे. काही शेतकऱ्यांना जिरायती दर देण्यात आला होता, तो बागायती करण्यात आला असून अजून काही गावातील भुसंपादनात जाणारे गट रेल्वे प्रस्तावात नसल्याने ते गट घेण्यासाठी पत्र व्यवहार सुरु असल्याचे शेतकरी नेते सचिन नलवडे यांनी सांगितले.