हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे- नाशिक हायवेवरून (Pune Nashik Highway) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. खरं तर पुणे आणि नाशिक हि दोन्हीही औद्योगिक शहरे असल्याने या मार्गावर गाड्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. परिणामी वाहतूक कोंडीचा प्रश्न नित्याचाच झाला आहे. आता यावर उपाय म्हणून नाशिक फाटा ते राजगुरुनगर खेड असा नवीन उन्नत रस्ता तयार होणार आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. तसेच या प्रवाशांच्या वेळेचीही मोठी बचत होणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून या संदर्भात महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नाशिक फाटा ते राजगुरुनगर खेड हा उन्नत मार्ग तयार करण्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, वाकी खुर्द, वाकी बुद्रुक, चिंबळी, कुरुळी व चाकण या गावांमध्ये भूसंपादन सुरू करण्यात आले आहे. तसेच, चाकण शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मेदनकरवाडी, कडाची वाडी, नाणेकरवाडी आणि खराबवाडी येथील जमिनींचे भूसंपादन करून पर्यायी बायपास तयार केले जाणार आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चे आयुक्त योगेश म्हसे यांनी गेल्या आठवड्यात एक आढावा बैठक घेतली, ज्यात संबंधित विभागांना जमीन मोजणी जलद करण्याचे निर्देश दिले होते जेणेकरून अधिग्रहण वेळेवर पूर्ण करता येईल. एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्रक्रिया जलद करण्यासाठी शक्य असेल तिथे विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) किंवा फ्लोअर स्पेस इंडेक्स (एफएसआय) नुसार ती संपादित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
कसा असेल नवीन उन्नत मार्ग- Pune Nashik Highway
नाशिक फाटा ते राजगुरुनगर खेड हा उन्नत मार्ग सुमारे 28 किलोमीटर लांबीचा असेल. केंद्र सरकारने गेल्या वर्षी या प्रकल्पासाठी ७,८२७ कोटी रुपये मंजूर केले होते. एकदा का हा प्रकल्प पूर्ण झाला कि दोन तासांचा प्रवास या प्रकल्पामुळे अवघ्या वीस मिनिटात पूर्ण होईल, म्हणजेच प्रवाशांचा तब्बल १०० मिनिटांचा वेळ वाचणार आहे. परिणामी चाकण एमआयडीसीला जोडणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावरील (Pune Nashik Highway) वाहतूक कोंडी कमी होईल अशी अपेक्षा आहे.




