हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Nashik Highway। पुणे आणि नाशिक हि महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक शहरे म्हणून ओळखली जातात. पुणे नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. परंतु या महामार्गवर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणून सरकारने एक नवीन प्रकल्प हाती घेतला आहे. नाशिक फाटा ते राजगुरुनगर (खेड) या 30 किलोमीटर लांबीच्या पुणे-नाशिक महामार्गाचे उन्नतीकरण होणार आहे. यासाठी तब्बल 7827 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्या या रस्त्यावरून प्रवास करायचं म्हंटल तर दीड ते दोन तास लागतात.. परंतु एका का हा प्रकल्प पूर्ण झाला कि मग हाच प्रवास फक्त 30 मिनिटांत पूर्ण होईल.
मिळालेल्या माहितीनुसार 30 किमी लांबीचा हा मार्ग (Pune Nashik Highway) नाशिक फाट्यापासून सुरू होऊन राजगुरुनगर (खेड) येथे संपेल. या उन्नत कॉरिडॉरसाठी पीएमआरडीए क्षेत्रातील 150 जमीनमालकांकडून सुमारे 9.74 हेक्टर जमीन संपादित होणार आहे. यामध्ये नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, वाकी खुर्द, वाकी बुद्रुक, चिंबळी, कुरुळी व चाकण या गावांचा समावेश आहे. यासाठीची भूसंपादन प्रक्रिया आणखी जलद पद्धतीने करण्यासाठी हस्तांतरण विकास हक्क (टीडीआर) किंवा चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय)चा वापर केला जाणार आहे. शहरी वाहतूक कोंडी कमी करणे हाच या प्रकल्पाचा उद्देश आहे. या मार्गिकेसाठी एकूण 10 प्रवेश आणि निर्गमनमार्ग असतील. प्रकल्पाची लांबी 30 किलोमीटर असून, एकूण 14 हेक्टर जमिनीचे संपादन आवश्यक आहे. 25 सप्टेंबर ही निविदा प्रक्रियेची अंतिम मुदत ठरविण्यात आली आहे.
चाकण MIDC ला फायदा – Pune Nashik Highway
पुण्यातील सर्वात वर्दळीच्या औद्योगिक केंद्रांपैकी एक असलेल्या चाकणमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. यावर उपाय करण्यासाठी अधिकाऱ्यांनी कडाची वाडी आणि खराबवाडीसारख्या जवळच्या भागातून बायपास रस्ते बनवण्याची योजना आखली आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर चाकण एमआयडीसीशी जोडणाऱ्या महामार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल, अशी अपेक्षा आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की या उन्नत कॉरिडॉरमुळे पुणे आणि नाशिक दरम्यानचा प्रवास वेळ कमी तर होईलच, याशिवाय या मार्गावरील लहान शहरांवरील वाहतुकीचा ताणही कमी होण्यास मदत होईल.




