Pune Nashik Railway । पुणे आणि नाशिक हे दोन्ही शहरे औद्योगीक शहरे मानली जातात. त्यामुळे पुण्याहून नाशिकला आणि नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही जास्त असते. मार्ग दोन्ही शहराला जोडण्यासाठी अजूनही रेल्वे सेवा सुरु नाही, रस्तेमार्गेच प्रवास करावा लागत असल्याने वेळ जास्त जातो. यामुळे नाशिक आणि पुणे ही दोन्ही शहरे रेल्वे जोडण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रस्तावाला आता मंजुरी मिळाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. मात्र पुणे- नाशिक रेल्वेच्या रूट मध्ये थोडा बदल करण्यात आला आहे.
याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी माहिती देताना म्हंटल, नाशिक पुणे रेल्वे मार्ग 235 किलोमीटरचा आहे. या मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. यामार्गासाठी नुकतेच 2500 कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली . परंतु या मार्गाचा रूट बदलण्यात आला आहे. पुणे ते नाशिक रेल्वे मार्गाला आता शिर्डीने जोडलं जाईल. त्यामुळे आता नाशिक-शिर्डी-पुणे (Pune Nashik Railway) असा हा नवा रूट असणार आहे. या बदलामुळे पुणे ते नाशिक अंतर ३० किलोमीटरने वाढणार आहे, पण ट्रेनचे स्पीड जास्त ठेवणार असल्याने लवकर पुण्यात जाता येईल. या रेल्वे मार्गासाठी भूसंपादन करण्याचे काम सुरू करण्यात आले असून नाशिकमधील सिन्नर तालुक्यातून भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
रेल्वेमार्गावर एकूण 20 स्टेशनचा समावेश –
पुणे- नाशिक रेल्वेमार्गावर (Pune Nashik Railway) एकूण 20 स्टेशनचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात ६ कोचची रेल्वे धावणार आहे. सध्या ज्या रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली आहे त्यामध्ये 18 बोगदे आणि 19 उड्डाणपुल आहेत, वाढत्या बोगद्यांमुळे प्रकल्पाचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या रेल्वेमार्गाला शिर्डीकडे वळवण्यात येणार आहे. या नव्या रेल्वेमार्गाबाबत रेल्वे मंत्रालयाकडून विचार सुरू असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केलं. हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यावर नाशिक-पुणे अंतर दोन तासांत गाठणे शक्य होणार आहे. तसेच शिर्डी मार्गे ट्रेन धावणार असल्याने नाशिक, पुण्यासह शिर्डीकरांना सुद्धा याचा मोठा फायदा होणार यात शंका नाही…