हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पुणे शहरातील (Pune City) कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील वर्दळीच्या स्वारगेट एसटी बस स्थानकात (Swarget Bus Stand) पहाटेच्या वेळी शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सध्या संबंधित तरुणीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर आली होती. ती एकटी असल्याचे पाहून एका अनोळखी व्यक्तीने तिची बस दुसरीकडे थांबली असल्याचे सांगितले. त्या व्यक्तीच्या सांगण्यावर विश्वास ठेवून ती त्याच्या सोबत गेली. आरोपीने तिला एका बंद शिवशाही बसजवळ नेले आणि बसमध्ये चढण्यास सांगितले. तिने आत प्रवेश करताच, आरोपीही तिच्या मागोमाग बसमध्ये घुसला. यानंतर, बसमध्येच तिच्यावर बलात्कार करून तो पसार झाला.
पीडितेची पोलिसांकडे तक्रार दाखल
या घटनेनंतर पीडित तरुणीने फलटणला जाणाऱ्या बसमध्ये बसून आपल्या एका परिचिताला फोन करून हा संपूर्ण प्रकार सांगितला. यानंतर तिने तत्काळ स्वारगेट पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांना आपल्यासोबत घडलेली घटना सांगितली. पुढे पोलिसांनी त्वरित कारवाई करत स्वारगेट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि आरोपीची ओळख पटवली. महत्वाचे म्हणजे, या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, स्वारगेट पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी आठ विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच, ताब्यात घेतलेल्या संशयीताची कसून चौकशी सुरू आहे. तसेच, दुसऱ्या बाजूला पीडित तरुणीवर मानसिक आणि शारीरिक आघात झाल्याने तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.




