पुणे | संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू आहे. तरी देखील नागरिकांची घरातून बाहेर पडण्याची वाढती संख्या पाहता प्रशासनाने पुणे शहरात आज रात्री १२ (सोमवार) पासून कडक ‘कर्फ्यू’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या शहरात अत्यावश्यक सेवांचे दुकान देखील केवळ २ तासासाठीच उघडी राहणार आहेत. तसेच आता महापालिका हद्द आता २७ एप्रिलपर्यंत पूर्णपणे सील करण्यात येणार आहे अशी माहिती पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.
शहरात संचारबंदी लागू असताना देखील नागरिक घरातून बाहेर पडण्याचे प्रमाण खूप आहे. तर, शहरात रुग्णांची संख्या देखील वाढत असून, हे रोखण्यासाठी प्रशासन सर्वोत्तपरी प्रयत्न करत आहे. मात्र तरीही शहरातील रुग्ण संख्या थांबविण्यात यश येत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुण्यातील कर्फ्यु बाबत प्रशासनाकडून काही वेळात आदेश जारी कऱण्यात येणार आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये ही असाच निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच पुणे आणि पिंपरीत लॉकडाऊन आणखी कडक करा अशा सूचना दिल्या होत्या. यामुळे आता शहरात पुढील 7 दिवस कर्फ्यु लागू करण्यात येत आहे. त्यात अत्यावश्यक सेवाना देखील काही प्रमाणात रोख लावण्यात येणार आहे. त्यासोबतच परिसरातील त्या-त्या भागात वेगवेगळ्या वेळेनुसार दुकाने सुरू ठेवण्याबाबत पोलीस विचार करत आहेत. त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चर्चा सुरू असून काही वेळातच याबाबतचे आदेश काढले जाणार आहेत.