Pune Porsche Accident| पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे.
कल्याणीनगरमध्ये अपघात झाल्यानंतर अल्पवयीन मुलाला वाजवण्यासाठी चालकांची अदलाबदल करण्यात आली होती, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. मात्र अपघात झाला त्यावेळी कार 17 वर्षीय मुलगाच चालवत होता हे एका व्हिडिओतून समोर आले, असल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता या घटनेप्रकरणी लोकांचा संताप आणखीन वाढला आहे.
पत्रकार परिषदेमध्ये पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माहिती दिली की, सुरुवातीला चालकाने आपणच कार चालवत असल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्याने दिलेल्या या जबाबावरूनच पुढील शोध सुरू करण्यात आला. मात्र या तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यानुसार कार 17 वर्षीय मुलगा चालवत होता हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता चालकाने कोणाच्या दबावाखाली हा जबाब दिला ते आम्ही तपासत आहोत. आमच्याकडे 17 वर्षीय मुलगाच गाडी चालवत असल्याचे व्हिडीओ आहे.
त्याचबरोबर, “आमच्याकडे पबमधील सीसीटीव्ही फुटेज आहे. ज्यात आरोपी मुलगा दारु पिताना दिसत आहे. आमचा तपास ब्लड रिपोर्टवर अवलंबून नाही. तो मुलगा शुद्धीत होता. ते सगळं दारुच्या नशेत होते, आपण काय करतोय याची त्यांना जाणीवच नव्हती, अशी स्थिती नव्हती. अपघात होऊ शकतो. त्यात एखाद्याचा जीव जाऊ शकतो याची जाणीव त्यांना होती” असेही पोलिसांनी सांगितले आहे.
सूत्रांकडून धक्कादायक खुलासा (Pune Porsche Accident)
धक्कादायक बाब म्हणजे, “आरोपी सतरा वर्षीय मुलाच्या पालकांनीच चालकाला या अपघाताची जबाबदारी घेण्यास सांगितले होते. या बदल्यात त्याला पैसे देण्याची ऑफर देण्यात आली होती.” अशी माहिती पुणे पोलीस दलातील सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या मुलाकडून कल्याणीनगरमध्ये मोठा अपघात झाला होता. या अपघातात 2 अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र तरी या मुलावर कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुण्यात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.