रुपाली चाकणकरांच्या घरावर रिपाइं महिला आघाडीने काढला मोर्चा; आठवलेंवरील ‘ती’ टीका झोंबली

पुणे । ‘आठवले ‘र ला र आणि ट ला ट जोडून कविता करुन स्टंट करतात’ अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्यावर केली होती. या टीकेनंतर चाकणकरांविरोधात आरपीआयची महिला आघाडी (RPI women wing) आक्रमक झाली आहे. त्यामुळं नाराज रिपाइंच्या महिला कार्यकर्त्यांनी चाकणकरांच्या पुण्यातील घरावर मोर्चा काढला.

राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी रविवार 24 जानेवारीला हजारोंच्या संख्येने मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाले होते (Farmer protest). शेतकऱ्यांचं ‘लाल वादळ’ सोमवारी राजभवनावर धडक देणार होतं. त्याविषयी बोलताना आठवलेंनी शेतकऱ्यांचा मुंबईतील मोर्चा हा फक्त पब्लिस्टिटी स्टंट असल्याची टीका केली होती. आठवलेंच्या या टीकेवर रुपाली चाकणकर यांनी आठवलेंवर टीकास्त्र सोडलं होत.

“रामदास आठवले यांनी शेतकरी आंदोलनाबद्दल जे वक्तव्य केलं, ते मोर्चात सहभागी 25 ते 30 हजार शेतकरी आंदोलकांचा जाणीवपूर्वक केलेला अपमान आहे. दिवसभर कविता करण्यात व्यस्त असलेल्यांनी शेती कशी करावी, याचीही माहिती घ्यावी. र ला र आणि ट ला ट जोडून कविता करुन स्टंट करणाऱ्यांना शेतकरी आंदोलन स्टंटच वाटणारच” असा टोला रुपाली चाकणकर यांनी लगावला होता.“केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयांची पाठराखण करणाऱ्या रामदास आठवलेंनी हिंमत असेल, तर आझाद मैदानात जाऊन आंदोलक शेतकऱ्यांचं समाधान करावं. आठवले पाठिंबा देत असलेल्या कायद्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे, हे त्यांना सांगू इच्छिते” असंही चाकणकर म्हणाल्या होत्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

You might also like