हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणेशोत्सवासाठी कोकणाला जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कोकणातील अनेक नोकरदार कामानिमित्त मुंबई- पुण्याला जात असतात. मात्र गणपती उत्सवासाठी काहीही करून गावी म्हणजेच कोकणात जायचंच असा विचार प्रत्येकाचा असतो. मग एसटी बस कितीही फुल्ल असली आणि रेल्वे बुकिंग झालं नसलं तरी त्याला पर्वा नसते. याच चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे ते सिंधुदुर्ग आणि पुणे ते गोवा प्रवास तुम्ही आता अवघीय १ तासांत पूर्ण करू शकता. त्यासाठी नवी विमानसेवा येत्या ३१ ऑगस्ट पासून सुरु होणार आहे.
Fly91 एअरलाइनने हि नवी विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली असून शनिवार आणि रविवारी ती उपलब्ध आहेत. पुणे-सिंधुदुर्ग मार्गासाठी, फ्लाइट IC 5302 पुणे विमानतळावरून सकाळी 8:05 वाजता निघेल आणि सकाळी 9:10 वाजता सिंधुदुर्ग विमानतळावर पोहोचेल. यानंतर परतीची फ्लाइट IC 5303 सकाळी 9:30 वाजता सिंधुदुर्गहून निघेल आणि पुण्यात सकाळी 10:35 वाजता पोहोचेल. म्हणजेच पुणेकरांना 55 मिनिटांत कोकणात तर 75 मिनिटांत गोव्यात जाता येणार आहे. या प्रवासासाठी 1,991 रुपयांचा खर्च येणार आहे. या नवीन विमानसेवेमुळे कोकणच्या पर्यटनाला नक्कीच चालना मिळेल आणि कमी वेळेत कोकण फिरता येईल.
तर दुसरीकडे गोव्याला सुद्धा पुण्याहून अगदी कमी वेळेत जाता येणार आहे. गोव्याला जाणाऱ्यांसाठी, फ्लाइट IC 1376 गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी 6:35 वाजता निघेल आणि पुण्याला सकाळी 7:40 वाजता पोहोचेल. यानंतर पार्टीची फ्लाइट IC 1375 पुण्याहून सकाळी 10:55 वाजता निघेल आणि दुपारी 12:10 वाजता गोव्यात पोचेल. येत्या ३१ ऑगस्ट नंतर हि विमानसेवा प्रवाशांसाठी सुरु होणार आहे. या दोन्ही मार्गावरील विमानसेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. कारण मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाची स्थिती काही ठीक आहे. संपूर्ण रस्ता हा खड्ड्यांची भरलेला असून प्रवास करणं खूपच अवघड बनलं आहे.
FLY91 चे संस्थापक, MD, आणि CEO मनोज चाको यांनी म्हंटल कि, आमचे उद्दिष्ट भारतातील हवाई कनेक्टिव्हिटी वाढवणे आहे आणि हि नवी विमानससेवा म्हणजे त्या दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे. गोवा आणि सिंधुदुर्गला पुण्याशी जोडल्याने केवळ प्रवासच सुकर होणार नाही तर या प्रदेशांमधील पर्यटन आणि व्यवसायासाठी नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. FLY91 गोवा आणि पुणे दरम्यान दैनंदिन कनेक्टिव्हिटी सुरू करण्यासाठी कटिबद्ध आहे असेही त्यांनी म्हंटल.