हॅलो महारष्ट्र ऑनलाईन Pune Tourist Places। पावसाळयात पुण्याच्या आसपासच्या पर्यटन स्थळांना भेट देण्याचा विचार करताय? तर मग आधी हि बातमी वाचाच… कारण पुणे जिल्हा प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी लोणावळा आणि मावळ तालुक्यातील प्रमुख पर्यटन स्थळांवर कडक प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. त्यानुसार, धोकादायक सेल्फी, कशीही गाडी चालवणे, पाण्याच्या मुख्य प्रवाहात उतरणे यांसारख्या थिल्लर गोष्टी करता येणार नाहीत. ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत या प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करावं लागणार आहे.
पावसाळयात पुण्यात येणाऱ्या पर्यटकांचा (Pune Tourist Places) आकडा वाढतो. पुण्यात अनेक निसर्गरम्य पर्यटनस्थळे असल्याने आणि प्रवासाच्या दृष्टीनेही पुण्यात येणं सोप्प असल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटकांचे पाय पुण्याकडे ओढतात. परंतु मागील काही वर्षात पर्यटनादरम्यान, अनेक दुःखद घडतानाही घडल्या आहेत. पाण्यात पोहताना किंवा सेल्फी काढताना मृत्यू झाल्याच्या घटनाही अनेकदा तुम्ही ऐकल्या असतील. या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी भारतीय नागरी संरक्षण संहिता, २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत काही प्रमुख पर्यटन स्थळांवर (Pune Tourist Places) प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. यामध्ये एकवीरा देवी मंदिर, कार्ला आणि भाजे गुहा, भाजे धबधबा, लोहगड, विसापूर आणि तिकोना, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, शिवलिंग पॉइंट आणि पवना धरणाभोवतीच्या परिसराचा सुद्धा समावेश आहे.
काय असतील निर्बंध – Pune Tourist Places
१) धोकादायक पाणवठ्यांमध्ये पोहण्यास किंवा धबधब्यांकडे जाण्यास सक्त मनाई
२) धबधब्याखाली थेट बसण्यास पूर्णपणे बंदी
३) उंच कड्यावर किंवा धबधब्यांजवळ सेल्फी काढणे प्रतिबंधित आहे.
४) रस्त्याच्या कडेला पार्किंग करण्यास मनाई
५) धोकादायक भागात निष्काळजी पणे वाहन चालविणे, असुरक्षित ओव्हरटेकिंगला मनाई
६) लाऊडस्पीकर, डीजे सेटअप, कार वूफर वापरण्यास परवानगी नाही.
७) महिला पर्यटकांशी कोणत्याही प्रकारचे असभ्य वर्तन किंवा गैरवर्तन केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल
पर्यटकांनी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे अन्यथा त्यांच्यावर भारतीय दंड संहिता, २०२३ च्या कलम २२३ अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे.




