Pune Traffic : पुणेकरांनो सांभाळून जा ! ‘या’ मार्गावर शनिवारपासून वाहतुकीत बदल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune Traffic : पुणे शहरातील कोरेगाव पार्क भागातून कॅम्प परिसराला जोडणारा साधू वासवानी रेल्वे उड्डाणपूल कमकुवत झाला आहे. लवकरच हा पूल पाडण्यात येणार असून त्या भागात नव्याने बांधकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील वाहतुकीमध्ये तात्पुरता बदल करण्यात येत आहे. यापूर्वी देखील अशा प्रकारे एक प्रयोग करून बघण्यात आला होता मात्र हा प्रयोग यशस्वी झाला नसल्यामुळे पूल पाडण्याचं काम लांबणीवर पडलं. त्यानंतर आता नवीन बदल करून वाहतुकीमध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे बंडगार्डन आणि कोरेगाव पार्क (Pune Traffic ) भागातील वाहतूक ही प्रायोगिक तत्त्वावर बदलण्यात आली आहे. या मार्गावर नक्की काय बदल झालाय पाहुयात.

कधीपासून वाहतूक बदलणार ?(Pune Traffic )

बंडगार्डन आणि कोरेगाव पार्क मधील वाहतुकीत प्रायोगिक तत्वावर बदल(Pune Traffic ) करण्यात आला आहे. येत्या शनिवारपासून म्हणजेच 10 फेब्रुवारीपासून या बदलाची अंमलबजावणी होणार आहे.

वाहतुकीत ‘हा’ बदल

  • वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी एका माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार, मोर ओढा चौक ते ब्लू डायमंड हॉटेल चौक यादरम्यान साधू वासवाणी पुलावरून हलक्या वाहनांसाठी एकेरी वाहतूक सुरू ठेवली आहे.
  • आय बी चौक ते सर्किट हाऊस चौक दरम्यान जनरल अरुण कुमार वैद्य मार्गावर एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे.
  • मोर ओढा चौकातून आयबी चौकाकडे जाण्यासाठी मोर ओढा चौक सरळ सदन कमांड समोरून कौन्सिल हॉल चौकातून उजवीकडे वळण घेऊन जावं लागणार आहे
  • पीएमटी आणि अन्य खासगी बस ना मोर ओढा चौकातून सरळ रस्त्यावरून डावीकडे वळावे लागणार आहे.
  • तारोपोर रोड जंक्शन येथून उजवीकडे वळून चौकात येता येणार असून येथून मंगलदास चौकात जाता येणार आहे.
  • ब्लू डायमंड चौकातून साधू वासवानी पुलावर वाहनांना प्रवेश नसल्याने ब्लू डायमंड चौक ते मोबोज चौक एकेरी मार्ग करण्यात आला आहे.
  • मोबोज चौकातून डावीकडे वळण घेऊन मंगलदास चौक आयबी चौक सर्किट हाऊस इथं जाता येणार आहे.
  • ब्लू डायमंड चौक ते मोबोज चौक एकेरी वाहतूक असल्याने मोबोज चौकातून मंगलदास रस्त्या मार्गे हॉटेल ब्लू डायमंड चौकाकडे प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यासाठी मोबोज चौकातून बंडगार्डन रस्त्याने श्रीमान हॉटेल चौक उजवीकडे वळून कोरेगाव पार्क जंक्शन इथे जाता येणार आहे.
  • आयबी जंक्शन ते सर्किट हाऊस चौक हा एकेरी मार्ग आवश्यकतेप्रमाणे दुहेरी करण्यात येणार आहे.