हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Train Fire । पुण्यात आज सकासकाळीच रेल्वे अपघाताची घटना समोर आली. दौंडहून पुण्याला जाताना डेमू ट्रेनच्या डब्यात अचानक आग लागली. या आगीत डब्याचा मोठा भाग जळून खाक झाला. ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झालं आहे. जीव वाचवण्यासाठी प्रवासी इकडे तिकडे धावले. किंकाळ्या, आरडाओरडा अन् सर्वांची पळापळ झाली. अग्निशमन दल आणि आरपीएक घटनास्थळी दाखल झाले आहे. आग वीजवण्याचे प्रयत्न सुरू असून एका प्रवाशाला चक्क टॉयलेट मधून बाहेर काढण्यात यश मिळालं आहे.
नेमकं काय घडलं? Pune Train Fire
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 07:05 वाजता दौंड वरून पुण्याच्या दिशेने हि ट्रेन निघाली होती. एका डब्यातील टॉयलेटमध्ये अचानक आग लागली. ही आग (Pune Train Fire) शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.टॉयलेटमध्ये आग लागली त्याचवेळी एक प्रवासी आत होता. दुर्दैवाने दरवाजा लॉक झाल्यामुळे तो बाहेर पडू शकत नव्हता. काही वेळातच टॉयलेटमधून धूर बाहेर येऊ लागला आणि आतमधील व्यक्तीचा आरडा-ओरडा ऐकू येऊ लागला. हे लक्षात येताच गाडीत असलेल्या काही सतर्क प्रवाशांनी प्रसंगावधान राखत त्या दरवाज्याकडे धाव घेतली. यानंतर काही प्रवाशांनी टॉयलेटचा दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांनी दरवाजा तोडून अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला.
दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे आग लागणे (Pune Train Fire) ही गंभीर बाब असून रेल्वे प्रशासनाने अशा घटनांना रोखण्यासाठी यंत्रणांची तातडीने तपासणी करावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. दुसरीकडे, दौंड रेल्वे पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीनंतर, रेल्वे अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला जाईल. आग लागलेल्या डब्याला ट्रेनपासून वेगळे करण्यात आले आहे आणि बाकी ट्रेन पुढच्या प्रवासासाठी सोडण्यात आली आहे.




