हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वेने गेल्या काही वर्षात ट्रेनच्या सोयींमध्ये कायापालट केला आहे. त्यामुळे अनेकजण जवळच्या आणि लांबच्या प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य देत आहेत. दरवर्षी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन ट्रेनची निर्मिती होऊ लागली आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुपरफास्ट झाला असून , वेळेची बचत झाली आहे. त्यातच पुणेकारणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुण्यातून धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या संख्येत वाढ होणार असून , हि संख्या फक्त एक किंवा दोन पुरतीच मर्यादित नसून तब्बल चार वंदे भारत ट्रेन धावणार आहेत.
वंदे भारत ट्रेनमुळे प्रवास अधिक गतिमान
पुण्यातील प्रवाशांसाठी वंदे भारत एक्सप्रेसच्या आगमनामुळे प्रवास जलद आणि सोयीस्कर झाला आहे. काही आठवड्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून मान्यता देण्यात आली . त्याचसोबत मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणारी वंदे भारत ट्रेन पुण्याच्या मार्गावरून जात आहे. या तीन ट्रेनमुळे पुण्याचा रेल्वे प्रवास अधिक गतिमान आणि सुरक्षित झाला आहे.
नवीन मार्गांवर धावणाऱ्या वंदे भारत ट्रेन
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पुणे सोलापुर, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या वंदे भारत गाड्यांमुळे पुणेकरांचा रेल्वे प्रवास अधिक गतिमान झाला आहे. आता नवीन मार्गांवर धावणाऱ्या वंदे भारत ट्रेन चर्चेत असलेल्या मार्गांमध्ये पुणे ते शेगाव, पुणे ते बडोदा, पुणे ते सिकंदराबाद, आणि पुणे ते बेळगाव या मार्गांचा समावेश आहे. कोणत्या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू करायची याबाबतचा निर्णय रेल्वे बोर्डाकडूनच घेतला जातो .पण अजून रेल्वे बोर्डाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही .