काँग्रेसला पुन्हा झटका : 50 वर्षांपासून पक्षात असलेल्या ‘या’ नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या काँग्रेसला बुरे दिन आल्याचे म्हंटले तर काहीही वावगे ठरणार नाही. कारण काँग्रेसमधील अनेक दिग्गज अशा नेत्यांकडून पक्षाला रामराम ठोकला जात आहे. नुकतेच गुजरातमध्ये हार्दीक पटेल यांनी काँग्रेसला सोडचिट्टी दिली आहे. त्यानंतर आता पन्नास वर्षांपासून काँग्रेससोबत असलेल्या पंजाब काँग्रेसचे ज्येष्ठ हिंदू नेते सुनील जाखड यांनी काँग्रेसला सोडत आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे पक्षाला मोठा झटका बसला आहे.

आगामी काळात देशातील काही राज्यात निवडणूका लागणार आहेत. अशात प्रत्येक राजकीय पक्ष संघटनात्मक बांधणी करू लागला आहे. पक्षातील वरिष्ठ मंडळींकडून नेत्यांना पक्ष बळकटीकरणाच्या सूचना दिल्या जात आहे. मात्र, दुसरीकडे काँग्रेसमध्ये पडझड सुरू झाली असल्याचे दिसत आहे. पंजाब काँग्रेसचे ज्येष्ठ हिंदू नेते सुनील जाखड यांनी आज भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले. जाखड यांचे कुटुंब जवळपास 50 वर्षे काँग्रेसमध्ये होते. सध्या त्यांच्या तिसर्‍या पिढीतील जाखड यांचे पुतणे संदीप जाखड काँग्रेसचे आमदार आहेत.

सर्व कुटूंब 50 वर्षांपासून काँग्रेससोबत

पंजाब काँग्रेसचे प्रमुख हिंदू नेते म्हणून सुनील जाखड यांची ओळख आहे. जाखड यांच्या कुटूंबाने 1972 ते 2022 पर्यंत प्रत्येक चांगल्या-वाईट काळात काँग्रेससोबत साथ दिली. गेली 50 वर्षे हे कुटूंब काँग्रेससोबत होते. या काळात कधीही वैयक्तिक फायद्यासाठी राजकारणाचा वापर केला नाही. किंवा कधीही कोणाला तोडण्याचा प्रयत्न केला. पंजाबचा राष्ट्रवाद, एकता आणि बंधुता यासाठी काँग्रेस पक्ष सोडत असल्याचे जाखड यांनी सांगितले.

सुनील जाखड यांचा राजकीय प्रवास?

काँग्रेला सोडचिठी देणारे सुनील जाखड हे पंजाब काँग्रेसचे प्रमुख हिंदू नेते होते. ते अबोहरच्या पंचकोसी गावचे रहिवासी असून त्यांचे वडील बलराम जाखड हे देखील काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांमध्ये होते. त्यांचे कुटुंब तीन पिढ्यांपासून काँग्रेसशी संबंधित होते. जाखड हे 2002 मध्ये पहिल्यांदाच अबोहर शहरातून आमदार झाले होते. येथून ते तीन वेळा आमदार झाले. यानंतर ते 2012 ते 2017 या काळात पंजाब विधानसभेत विरोधी पक्षनेतेही होते. सुनील जाखड यांनी 2017 मध्ये भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघात मोठ्या फरकाने विजय मिळवला होता.