नवी दिल्ली । कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि संकट पाहून पंजाब सरकारने कडक पाऊल उचलले आहे. पंजाब सरकारने कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर केले आहे. परंतु हे लॉकडाऊन-१ या प्रमाणे इतके कठोर असणार नाही. सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार पंजाबमध्ये शनिवार आणि रविवार तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी संपूर्ण लॉकडाऊन असेल. म्हणजेच शनिवार आणि रविवार तर सरकारी सुट्टीच्या दिवशी दुकाने उघडली जाणार नाहीत. याशिवाय राज्यात वाहतुकीवरही बंदी घालण्यात आली आहे.
आदेशानुसार केवळ ई-पास असलेल्या लोकांनाच येणे आणि जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. याखेरीज पंजाब सरकारने हे स्पष्ट केले आहे की औद्योगिक युनिट आठवड्यातून ७ दिवस सुरू असतील. पंजाबमध्ये कोरोना रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. सध्या राज्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या २८०५ आहे, तर या साथीमुळे ५५ लोकांचा बळी गेला आहे.
दरम्यान, देशभरात लॉकडाऊनचे ४ टप्पे झाल्यानंतर देशभरात अनलॉकचा पहिला टप्पा सुरु करण्यात आला. त्यात प्रमुख रेल्वे सेवा आणि मेट्रो सेवा बंद ठेवल्याने सगळा भार सार्वजनिक बस वाहतूक आणि रस्ते वाहतुकीवर येऊ लागला आहे. त्यातून सोशल डिस्टसिंगचे तीन-तेरा वाजत असून कोरोना पसरण्याची भीती आणखी वाढली आहे. मुंबईत गर्दी पाहता पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिला. तर दिल्लीतही लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याचा विचार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल करत आहेत.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in