हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Purandar Airport । पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव अशा सात गावांमध्ये प्रस्तावित विमानतळ प्रकल्पासाठी 2832 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार असून त्यादृष्टीने राज्य सरकारकडून जोरदार हालचाली सुरु आहेत. मात्र त्यातच आता एखतपूरआणि मुंजवडी गावातील नागरिकांनी या भूसंपादनाला विरोध केला आहे. तसेच जमिनी देण्यासाठी काही अटीही सरकार पुढे टाकल्या आहेत. त्यानुसार, पुरंदर येथील प्रास्तवित विमानतळासाठी सरकारने आम्हाला प्रतिएकर १० कोटी रुपये द्यावेत, अन्यथा आमच्या जमिनी आम्ही देणार नाही अशी भूमिका एखतपूरआणि मुंजवडी ग्रामस्थांनी घेतली आहे.
प्रस्तावित विमानतळाच्या (Purandar Airport) भूसंपादनासंदर्भात महसूलमंत्र्यांची बाधित गावातील शेतकऱ्यांनी चर्चा केली होती. त्यामध्ये पर्याय देण्याचे महसूलमंत्र्यांनी सुचविले होते. पुरंदर विमानतळासाठी मौजे एखतपूर मधील २१६.२८० हेक्टर क्षेत्र आणि मौजे मुंजवडी येथील १२९.३२३ हेक्टर क्षेत्र संपादित होणार आहे. त्या अनुषंगाने एखतपूर आणि मुंजवडी या गावांची ग्रामसभा झाली. त्यामध्ये एकरी १० कोटी रुपये द्यावेत. त्याचबरोबर विमानतळाच्या परिसरातच ३५ टक्के विकसित भूखंड द्यावा, अशा प्रकारच्या काही मागण्या ग्रामस्थांकडून करण्यात आल्या आहेत.
काय आहेत ग्रामस्थांच्या मागण्या ? Purandar Airport
रोख परतावा १० कोटी प्रति एकर एकरकमी व बाधित क्षेत्राच्या ३५% विमानतळ हद्दीमध्ये भूखंड देण्यात यावा व त्याचा ५ एफ एस आय असावा.
प्रकल्पात येणाऱ्या सर्व शासकीय व निमशासकीय किंवा खासगी आस्थापनावरती कुशल व अकुशल स्वरुपाच्या नोकऱ्या व रोजगाराच्या संधी बाधित भूमिपत्रांना व त्यांच्या वारसांना देण्यात याव्या.
शासकीय नोकरीत व शिक्षणात गुणवत्तेवर आधारित आरक्षण व प्रकल्प ग्रस्त असल्याचे दाखले बाधित भूमिपत्राने देण्यात यावे.
बेघर व भूमिहीन कुटुंबांना निवासी भूखंड तीन पटीत मिळावा व मोबदला चालू किमतीच्या अडीच पटीने देण्यात यावा व तसेच व्यावसायिक भूखंडाच्या बदलत्या भूखंड व मोबदला चालू किमतीच्या अडीच पटीने देण्यात यावा.
प्रकल्प बाधित क्षेत्राचा मोबदला देताना सरसकट किंमत ठरविण्यात यावी, त्यामध्ये जिरायती / बागायती याबाबी विचारात घेऊ नये.
जमीन भूसंपादन प्रक्रिया एमआयडीसीकडे न देता इतर शासकीय संस्थेकडे देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी ग्रामसभेला एखतपूर गावच्या सरपंच शीतल टिळेकर, उपसरपंच तुषार झुरंगे, माजी सरपंच कृष्णासेठ झुरंगे, ग्रामपंचायत सदस्या विद्या झुरंगे, पोलीस पाटील बंडू धिवार, मुंजवडी गावच्या पोलीस पाटील कविता झुरंगे, ग्रामसेवक अजित जगताप, यांच्यासह गावातील ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.




