वैजापूर | शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार व वैजापूरचे उपनगराध्यक्ष साबेर खान यांच्या एका कार्यक्रमांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यामुळे शिवसेनेत ऑल इज वेल नसल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणामुळे कार्यक्रमस्थळी वातावरण चांगलेच तापले होते. विशेष म्हणजे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत ही घटना घडली.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे गुरुवारी वैजापूर दौऱ्यावर होते. दुपारी एक वाजेच्या दरम्यान त्यांनी एका साखरपुड्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी तेथे उपस्थित असलेले शिवसेनेचे उपनगराध्यक्ष साबेर खान यांना त्यांनी दुरूनच नमस्कार केला. मात्र, साबीर खान यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले यानंतर डेपो रोडवरील एका कार्यक्रमाला सत्तार यांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना त्यांनी साबेर खान हे वृद्ध झाले असून ते बहिरे झाल्याची कोपरखळी मारली. येथे साबेर खान उपस्थित नव्हते मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही बाब त्यांच्या कानावर घातली. हा सर्व प्रकार साबेर खान यांना कळेपर्यंत मंत्री सत्तार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एका कार्यक्रमाला हजर झाले होते. आपल्याबद्दल सत्तार यांनी केलेल्या टिप्पणीवर साबीर खान हे चांगलेच संतापले होते.
यानंतर उपनगराध्यक्ष साबेर खान हे कार्यालयातून थेट सत्तार बोलत असलेल्या कार्यक्रमात आले तेथे भर सभेत मंत्री सत्तार यांच्यावर ते धावून गेले पण तुम्ही माझी बदनामी का करता ? असा सवाल केला. यावेळी मंत्री सत्तार व उपनगराध्यक्ष साबेर खान यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, आमदार रमेश बोरणारे, दिनेश परदेशी, शिल्पा परदेशी, बाळासाहेब संचेती, नितीन पाटील आदींची उपस्थिती होती या नेत्यांनी हस्तक्षेप केल्याने पुढील वादक टळला.