किरपेत ग्रामसभेत दोन गटात राडा, गावात पोलिस बंदोबस्त तैनात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | किरपे (ता. कराड) येथे ग्रामसभेवेळी दोन गटात जोरदार राडा झाला. उपस्थितांनी शिविगाळ, दमदाटी करीत दोन्ही गटातील ग्रामस्थांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. आज दि. 20 रोजी बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने गावात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून दोन्ही गटातील एकुण सहाजणांवर अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गावात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरपे येथे बुधवारी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेसाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधक उपस्थित होते. तसेच ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला. तसेच बेकायदा वृक्षतोडीचाही आरोप झाला. या दोन्ही विषयावर वादळी चर्चा झाली. चर्चेचे पर्यवसन हमरीतुमरीत झाल्यानंतर सभा उधळली. दोन गट आमने-सामने भिडले. त्यांनी एकमेकांना शिविगाळ, दमदाटी करीत धक्काबुक्की केली. सभास्थळी तणाव निर्माण झाल्यानंतर याबाबतची माहिती कराड ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने त्याठिकाणी धाव घेऊन दोन्ही गटांना शांत राहण्याचे आवाहन केले. रात्री उशिरा याप्रकरणी कराड ग्रामीण पोलिसात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत.

उपसरपंच विजय जयसिंगराव देवकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन, पांडूरंग लक्ष्मण कदम, उत्तम नामदेव लोहार यांच्यासह अन्य काहीजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामसभा सुरू असताना विविध विषय मांडून त्यावर चर्चा करण्यात येत होती. त्यावेळी संशयीतांनी गोंधळ घालीत शिविगाळ, दमदाटी करण्यास सुरूवात केली. सरपंच प्रज्ञा विद्याधर देवकर यांच्यासह उपसरपंचांनी संबंधितांना शांत राहण्यास सांगीतले असतानाही त्यांनी शिविगाळ, धक्काबुक्की केल्याची तक्रार उपसरपंच देवकर यांनी केली आहे.

याउलट पांडूरंग लक्ष्मण कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन, विद्याधर पंढरीनाथ देवकर, शंकर महादेव देवकर, राहूल आनंदा देवकर, प्रदीप शंकर देवकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीतील घोटाळा आणि बेकायदा वृक्षतोडीचा आरोप केला म्हणून तसेच त्याबाबतची तक्रार गटविकास अधिकारी आणि वन विभागाकडे केल्याचा राग मनात धरुन संशयीतांनी धक्काबुक्की, शिविगाळ केल्याचे कदम यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Leave a Comment