जर केंद्राने दुजाभाव केला असता तर महाराष्ट्राला एवढी लस मिळाली असती का? विखे पाटलांचा संतप्त सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना केंद्राकडून मात्र राज्याला हवी तशी मदत मिळत नसून केंद्र महाराष्ट्राच्या बाबतीत नेहमी दुजाभाव करत असा आरोप सातत्याने महाविकास आघाडी सरकार कडून केला जातो. दरम्यान सरकारच्या या आरोपाला भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जर केंद्राने दुजाभाव केला असता तर महाराष्ट्राला एवढी लस मिळाली असती का? केंद्राच्या सहकार्याशिवाय लसीकरणात राज्याला प्रगती करता आली असती का? असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

देशात करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला. असे असूनही केंद्र सरकार लसीकरणात दुजाभाव करते हा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचा आरोप आश्चर्यकारक वाटतो. एकीकडे राज्यात सर्वाधिक लसीकरण झाले म्हणून सरकार पाठ थोपटून घेतय. मग केंद्राच्या सहकार्याशिवाय हे लसीकरण झाले काॽ आपण काय बोलतोय याचे भान आघाडीच्या मंत्र्यांनी ठेवायला हवे. एक मे पासून लसीकरणासाठी सर्वच राज्यांनी पुढाकार घेतला आहे,’ याकडेही विखे यांनी लक्ष वेधले.

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात कोरोनासाठी सुविधा द्या यासाठी मंत्री पत्र लिहतात हे आश्चर्य आहे. एक वर्षानंतर मंत्र्यांना जिल्ह्यात सुविधांचा अभाव असल्याचं कळलंय. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणे हा फक्त फार्स असून आपली अब्रू आणि अपयश झाकम्याचा हा प्रकार असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर केलीय.

You might also like