आम्ही दिलेला जाहीरनामा हा फक्त काँग्रेस पक्षाचा नाही तर प्रत्येक भारतीयाचा आहे. लोकांना काय हवंय ते समजून घेऊनच आम्ही हा जाहीरनामा बनविला आहे. पैसा कुठून येणार आणि तो कसा वापरला जाणार याचा आम्ही अभ्यास केला असल्याचं राहुल पुढे म्हणाले. रोहिणी गायकवाड हिने विचारलेल्या रोजगाराच्या प्रक्रियेत असणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय होणार, आणि पात्रतेप्रमाणे काम मिळणार का? या प्रश्नाला उत्तर देताना कौशल्य ओळखून त्याचा आदर करायला हवा. विद्यापीठे ही रोजगाराशी जोडली नसल्याने बेरोजगारी वाढत आहे. कार्पोरेट क्षेत्र ज्यावेळी विद्यापीठांना जोडली जातील त्यावेळी रोजगाराचा प्रश्न सुटेल असं मत राहुल गांधींनी व्यक्त केलं. देशातून पळून गेलेल्या उद्योगपतींवरही राहुल गांधींनी ताशेरे ओढले.
महिलांच्या राजकारणातील भविष्यावर विचारलेल्या प्रश्नावर, काँग्रेस पक्ष येत्या काळात महिलांच्या सर्वच क्षेत्रातील भरतीवर लक्ष देणार असून विधानसभा आणि लोकसभेमध्येही तुम्हाला त्याची परिणीती दिसून येईल असं राहुल म्हणाले. नोटबंदी हे भारताच्या इतिहासातील धक्कादायक प्रकरण असून देश अजून त्या धक्क्यातून बाहेर पडलेला नाही. नवउद्योजकांना कर्ज घेताना लाच द्यावी लागणे निराशाजनक आहे, देशातील काही लोकांच्या हातात एकवटलेली संपत्ती अर्थव्यवस्थेला धोका पोहचवत आहे. पंचायत पातळीवर देशभरात १० लाख रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे त्याकडे लक्ष देऊन लोकांच्यात व सरकारमध्ये काम करणारी संस्था उभारून त्याला योग्य दिशा देणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन राहुल गांधी यांनी केलं. पुण्याच्या विविध महाविद्यालयातील ५ हजारहून अधिक विद्यार्थी या संवाद मेळाव्याला उपस्थित होते.