हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी “राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतरच देशात खऱ्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवली गेली” असे वक्तव्य केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर आता काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना राहुल गांधी यांनी मोहन भागवत यांच्या जोरदार टीका केली आहे.
भागवतांवर टीका करत राहुल गांधी म्हणाले की, “मोहन भागवत यांनी 1947 साली भारत स्वतंत्र झाला नाही, असे विधान केले. त्यांचे हे बोल संविधानाविरोधी आहे आणि प्रत्येक भारतीयाच्या स्वातंत्र्याचा अपमान आहे. भागवतांनी हे विधान अन्य देशात केले असते तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली असती.”
तसेच, “राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला स्वातंत्र्याचा आधार मानणे म्हणजे स्वातंत्र्य चळवळ आणि संविधानाची वैधता नाकारण्यासारखे आहे. हा आपल्या देशाचा आणि प्रत्येक भारतीयाच्या स्वातंत्र्याचा अपमान आहे. आपण हे ऐकणे बंद केले पाहिजे.” असेही राहूल गांधी म्हणाले.
दरम्यान, इंदौरमध्ये आयोजित कार्यक्रमात मोहन भागवत म्हणाले होते की, “राम मंदिर हे भारताच्या खऱ्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. त्यामुळे पौष शुक्ल द्वादशी हा भारताच्या स्वातंत्र्याचा खरा दिवस मानला पाहिजे” त्यांच्या याच वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. सध्या भागवत यांच्या वक्तव्यावर विरोधी पक्ष नेते जोरदार टीका करत आहेत.