हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची जयंती आहे. परंतु त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. तसेच राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. राहूल गांधी (Rahul Gandhi) यांनी छत्रपती शिवरायांच्या जन्मदिनी त्यांना श्रद्धांजली वाहिल्यामुळे भाजपने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
भाजपने काय म्हटले?
राहुल गांधींच्या ट्विटवर आक्षेप घेत भाजपने म्हटले आहे की, “महाराष्ट्रातील लोकांचा, महापुरुषांचा राहुल गांधी यांच्याकडून सतत अपमान केला जात असतो. जयंतीच्या दिवशी आदरांजली देतात. परंतु राहुल गांधी महाराष्ट्रातील महापुरुषांच्या विषयी कळत नकळत अनादार व्यक्त करतात. त्यातील हा गंभीर प्रकार आहे. त्यांनी हे ट्विट मागे घ्यावे, अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले”
राहूल गांधी यांचे ट्विट
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना सदर नमन आणि विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या शौर्य आणि धैर्याने त्यांनी आपल्याला निर्भयतेने आणि पूर्ण समर्पणाने आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. त्यांचे जीवन आपल्यासाठी सदैव प्रेरणादायक राहील.”
दरम्यान, राहुल गांधी यांनी केलेल्या याचं ट्विटमुळे राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. तसेच सोशल मीडियावर देखील त्यांच्याबाबत टीका केली जात आहे. कारण संपूर्ण राज्यभरात शिवजन्मोत्सव सोहळा मोठया उत्साहात साजरी केला जात आहे. अशात राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे आता या वादानंतर राहुल गांधी काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.