मोठी बातमी!! राहुल गांधी 14 जुलैला आषाढी वारीत सहभागी होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस खासदार आणि संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यंदाच्या आषाढी वारीत (Ashadhi Wari) सहभागी होणार आहेत. राहुल गांधी रविवारी म्हणजेच येत्या 14 जुलै रोजी वारीत सहभागी होणार आहेत. अवघा वारकरी संप्रदाय विठुरायाच्या दर्शनासाठी पंढपुराकडे जात असताना आता राहुल गांधी सुद्धा या वारीत चालताना आपल्याला दिसतील. राहुल गांधी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतील. राहुल गांधी वारीत वारकऱ्यांशी संवाद साधण्याची सुद्धा शक्यता आहे.

राहुल गांधी यांनी आषाढी वारीत सहभागी व्हावे यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांना निमंत्रण दिलेलं होतं. शरद पवार यांनीही राहुल गांधीना वारीचं महत्व पटवून देत या वारीत सहभागी व्हा असं आवाहन केलं होते. अखेर राहुल गांधी यांनी हे आमंत्रण स्वीकारले असून ते पहिल्यांदाच वारीत सहभागी होणार आहेत. राहुल गांधीं13 किंवा 14 जुलै रोजी वारीत सहभागी होतील असे सांगण्यात येत होते. आता मात्र त्यांच्या या दौऱ्यासाठी 14 जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे वारकऱ्यांना १४ जुलैला राहुल गांधी वारीत पाहायला मिळतील.

राहुल गांधी यांची पायी वारी हि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी अतिशय महत्वपूर्ण ठरू शकते. एकीकडे भाजप आणि शिंदे गट हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरत असताना राहुल गांधी थेट आषाढी वारीत पायी सहभागी होऊन भाजपच्या हिंदुत्वाला छेद देऊ शकतात. त्यामुळे राहुल गांधी यांच्या या दौऱ्याचे महाराष्ट्र काँग्रेसतर्फे कसे नियोजन केले जाते? याची आता सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. दुसरीकडे अजित पवार यांनीदेखील 7 जुलै रोजी पालखी सोहळ्यात हजेरी लावली होती.