हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राहुरी म्हटलं की आठवतं ते सुप्रसिद्ध कृषी विद्यापीठ आणि दुसरं म्हणजे तनपुरे आणि कर्डिले यांच्यातलं राजकीय शीतयुद्ध… 2009 आणि 2014 अशा दोन्ही वेळेस झालेल्या तनपुरे विरुद्ध कर्डिले यांच्यातील लढतीत तनपुरे यांनी चेहरे बदलले पण निवडून आले ते कर्डिलेच… सलग दोन टर्म पराभवाची सल सहन करत तनपुरेंचे पुत्र प्राजक्त तनपुरे हे 2019 ला निवडणूक रिंगणात उतरले… आणि जिंकले देखील… तनपुरे कुटुंबाचा पंधरा वर्षाचा राजकीय वनवास संपला… आणि प्राजक्त तनपुरे यांच्या रूपानं कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे घेऊन जाणारा चेहरा तनपुरे कुटुंबाला मिळाला…. प्राजक्त तनपुरे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत… तर दुसऱ्या बाजूला त्यांचे विरोधक शिवाजीराव कर्डिले हे भाजपात… त्यामुळे 2019 प्रमाणेच यंदाही राहुरीत तनपुरे विरुद्ध कर्डिले असाच संघर्ष बघायला मिळणार असला तरी राजू शेटे हे नाव ऐन निवडणुकीत धुमाकूळ घालू शकतं…
सर्वात महत्त्वाचं म्हणजे महायुतीत ही जागा भाजपला सुटणार असली तरी अजितदादांचा राहुरी च्या जागेसाठी असणारा आग्रह आणि शिवाजीराव कर्डिले – अजितदादा भेट हा सगळा सिक्वेन्स पाहता अजितदादा राहुरी मतदारसंघात गेम चेंजर ठरू शकतात… येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्राजक्त तनपुरे विरुद्ध शिवाजीराव कर्डिले अशीच सरळ लढत होईल? की अजितदादांच्या काही वेगळ्या भूमिकेमुळे राहुरीच्या निवडणुकीला नवा राजकीय रंग लागेल? लोकसभेच्या पराभवानंतर सुजय विखे पाटील चालू सिच्युएशन बघत राहुरी तू आमदारकीसाठी ट्राय मारतील का? या सगळ्या सीनमध्ये राजू शेटे कितपत प्रभावी राहतील? त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट…
तसं बघायला गेलं तर राहुरी विधानसभा मतदारसंघावर तनपुरे कुटुंबाचा वरचष्मा राहिला… बाबुराव तनपुरे, प्रसाद तनपुरे आणि सध्या प्राजक्त तनपुरे अशी एकाच कुटुंबातील तिसरी पिढी सध्या राहुरी विधानसभेवर वर्चस्व गाजवतेय… पण याच तनपुरे कुटुंबाचा राजकीय डाऊन फॉल सुरू झाला तो 2009 साली… मतदार संघाची नव्याने पुनर्रचना झाली… राहुरी – नगर – पाथर्डी अशा तीन तालुक्यातील काही गावांचा मिळून सध्याचा राहुरी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला… तेव्हा झालेल्या पहिल्याच निवडणुकीत एकमेकांना आमने-सामने भिडले ते राष्ट्रवादीकडून प्रसाद तनपुरे विरुद्ध भाजपकडून शिवाजीराव कर्डिले… मात्र मतदारसंघ बदलल्यानंतर कर्डिले यांनी आपल्या नात्यागोत्यांच्या राजकीय गोतावळ्याची बेरीज करत… त्याला शिवसेना आणि भाजप युतीची साथ मिळाल्याने राहुरीमधून कर्डिले यांनी भाजपाला विजय मिळवून दिला… 2014 ला मात्र युती आणि आघाडी वेगवेगळ्या लढल्याने भाजपकडून शिवाजीराव कर्डिले तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेकडून प्रसाद तनपुरे यांनी आपल्या पत्नी उषा तनपुरे यांना निवडणूक रिंगणात उतरवलं… मात्र झालेल्या चौरंगी लढतीत मत विभाजनाचा फायदा कर्डीलेंना झाला आणि ते सलग दुसऱ्यांदा राहुरीतून आमदार झाले… मात्र 2019 ला तनपुरे विरुद्ध कर्डिले अशी समोरासमोर लढत झाली… यात राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे तर दुसऱ्या बाजूला भाजपकडून तत्कालीन आमदार शिवाजीराव कर्डिले हे निवडणूक रिंगणात होते… राहुरीतून आमदारकीची हॅट्रिक मारण्याचा चान्स कर्डिलेंसाठी चालून आला होता… मात्र मागील दोन टर्मचा वचपा काढत अखेर तनपुरे कुटुंबातील तिसऱ्या पिढीच्या प्राजक्त तनपुरे यांनी आमदारकीवर ठाण मांडलीच…
पण राहुरीची राजकीय विभागणी जाम इंटरेस्टिंग आहे… लोकसभेसाठी राहुरीची 64 गाव अहमदनगर विधानसभा मतदारसंघात येतात… तर देवळाली प्रवरा आणि 32 गावे शिर्डी लोकसभा मतदारसंघात येतात… हिच गाव विधानसभेला श्रीरामपूर मतदारसंघात मोडतात… थोडक्यात राहुरीला दोन खासदार आणि दोन आमदार लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात, हे मोठं आश्चर्य… लोकसभा निवडणुकीला प्राजक्त तनपुरे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा म्हणजेच निलेश लंके यांचा फ्रंटला येत प्रचार केला होता… राहुरी इथून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला लीड मिळालं नसलं तरी आपल्या प्रभावक्षेत्राखालील मोठं मतदान त्यांनी निलेश लंकेच्या पाठीशी लावलं… त्यामुळे राहुरीत यंदा लढत कट टू कट होणार असल्याचं बोलले जातय…
दुसरीकडे कर्डिले यांनीही निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व त्या हालचाली करायला सुरुवात केली आहे… श्रीगोंद्या सोबतच आपला पारंपारिक मतदारसंघ राहुरीतूनही निवडणूक लढवण्याची चाचपणी त्यांनी सुरू केली आहे… श्रीगोंद्याचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते हे प्रकृतीच्या कारणाने निवडणुकीतून बाजूला गेले तर. श्रीगोंद्यातून लढता यावं, म्हणून त्यांनी आपली टीम तयार ठेवली आहे… सोबतच राहुरीतही ते उमेदवारीसाठी लक्ष देऊन आहेत… या सगळ्यात भाजपाच्या शिवाजीराव कर्डिले यांनी अजितदादा यांची घेतलेल्या भेटीने मतदारसंघात नव्या चर्चांना तोंड फुटलं.. राहुरी तालुक्यातील डॉ. बाबूरावदादा तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संबंधाने ही चर्चा सुरू आहे. हा कारखाना बंद पडल्याने तो थकीत कर्जापोटी जिल्हा सहकारी बँकेने ताब्यात घेतला आहे. तो भाडेतत्त्वावर अजितदादांनी चालवण्यास घ्यावा, या संदर्भात चर्चा झाली असल्याचं स्पष्टीकरण कर्डिले यांनी दिलं असलं तरी कर्डिलेंच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणूक लढण्याबाबत खलबत्त झाली असल्याची शक्यताही यावेळेस नाकारता येत नाही… त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी… शरद पवार विरुद्ध अजित पवार… घड्याळ विरुद्ध तुतारी… अशी कट टू कट राहुरीची निवडणूक होऊ द्यायची, यावर महायुतीचा.. आणि स्पेसिफिकली कर्डीलेंचा भर दिसतोय…
2014 ला तिकीट वाटपाच्या कार्यक्रमात जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यातील अंतर्गत संघर्षामुळे तनपुरे यांचे तिकीट कापण्यात आलं… आणि अजितदादांनी हट्टाने शिवाजी गाडे यांना तिकडे देऊ केलं… तेव्हा तनपुरे कुटुंब हे राष्ट्रवादीवर आणि विशेषतः अजितदादांवर नाराज होतं… पुन्हा ते राष्ट्रवादीत आले असले तरी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांचं शरद पवार गटासोबत राहणं(tanpure with sharad pawar) हेच अजित दादांसोबत असणार त्यांचं अंतर्गत वैरावर शिक्कामोर्तब करतं… राष्ट्रवादीत शरद पवारांसोबत राहिलेल्या आमदारांना धडा शिकवण्यासाठी अजित दादांनी मोर्चे बांधणी आत्तापासूनच सुरू केली आहे… त्याचाच एक भाग म्हणून कर्डिलेंना राष्ट्रवादीत घेत ते तनपुरे यांचं राजकीय वर्चस्व मोडीत काढू शकतात… पण अगदीच उघड उघड बोलायचं झालं तर राहुरीत सध्यातरी महाविकास आघाडीच्या बाजूने म्हणजेच तनपुरे यांच्या बाजूने वातावरण दिसतंय…जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर कर्डिले मतदारसंघापासून थोडे दुरावले होते… ते कोणत्या पक्षाकडून? कोणत्या मतदारसंघातून? निवडणूक लढवणार याबाबत अद्याप संधीग्धता असल्यामुळे… आपली भूमिका जर लवकर स्पष्ट केली नाही तर याचा मोठा फटका कर्डिलेंना येणाऱ्या विधानसभेला बसू शकतो…
2009 आणि 2014 चा निकाल पाहिला तर तिरंगी किंवा चौरंगी लढतीत मत विभाजनाचा फायदा हा कर्डिलेंना झाल्याचं पाहायला मिळतं.. मात्र 2019 ला कर्डिले विरुद्ध तनपुरे अशी फेस टू फेस लढत झाल्यामुळे तनपुरे यांचा विजय सोपा झाला… हे सगळं पाहता मतदार संघातून आघाडीची म्हणजेच तनपुरे यांची 25 ते 30 हजार मत खाणारा भाजप पुरस्कृत तिसरा अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्याची चर्चा भाजपच्या गोटात सुरू असल्याची सध्या माहिती मिळतेय… त्यात सर्वात फ्रंटला नाव येतं ते रामचंद्र उर्फ राजू शेटे यांचं… धर्मवीर छत्रपती संभाजी राजे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शेटे यांचा मतदारसंघातील तरुण पिढीवर वरचष्मा आहे… त्यातही मराठा मतं शेटे यांच्या पारड्यात पडली तर याचा अर्थातच तनपुरे यांना मोठा लॉस सहन करावा लागू शकतो… मनोज जरांगे पाटील यांच्या प्रभावाखाली जर शेटे यांना उमेदवारी मिळाली तर राहुरीत एक खमका तिसरा प्रतिस्पर्धी कर्डिले आणि तनपुरे यांना आव्हान देताना दिसू शकतं… त्यामुळे मनोज जरांगे फॅक्टर राहुरीत विधानसभेला निर्णायक ठरू शकतो, असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही…
यासोबतच माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे पुत्र आणि देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम हे देखील इच्छुक आहेत.. त्यामुळे निवडणूक दुहेरी- तिरंगी की चौरंगी होतेय, मनोज जरांगे फॅक्टर, अजित दादांच्या राष्ट्रवादीची भूमिका, संभाव्य बंडखोरी, मतदार संघातील गटातटाच राजकारण हे ज्याच्या बाजूने झुकेल तो राहुरी चा आमदार होईल, एवढं मात्र फिक्स आहे… बाकी तुम्हाला काय वाटतं? राहुरी विधानसभा मतदारसंघाचा 2024 चा आमदार कोण होतोय? शिवाजीराव कर्डिले – प्राजक्त तनपुरे – राजू शेटे – सत्यजित कदम यांपैकी विधानसभा निवडणुकीत कुणाला आमदारकीचा गुलाल लागतोय? या सगळ्याबद्दल तुमचा कौल कुणाच्या बाजूने? तो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा