फलटण | तालुक्यातील झडकबाईचीवाडी येथे सागर ढाबावर सुरू असलेल्या तीनपानी पत्त्यांच्या जुगार क्लबवर फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये पैशावर जुगार खेळणाऱ्या ढाबा मालकासह 9 जणांना ताब्यात घेतले आहे. या छाप्यात 3 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फलटण ग्रामीण पोलिसांना सागर ढाबा येथे तीनपानी पत्त्यांचा जुगार खेळला जात असल्याची खबर मिळाली होती. झडकबाईचीवाडी हद्दीतील फलटण-पुसेगाव रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सागर ढाब्याच्या इमारतीमध्ये सुरू असणाऱ्या तीनपानी पत्त्यांच्या जुगार क्लबवर पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला. या वेळी सतीश हनुमंत शिंदे, अप्पा लालासाहेब सालगुडे, शहाबुद्दीन यासिन आतार, सचिन संपत सोनवलकर, धनाजी शिवाजी जाधव, राकेश मच्छिंद्र नवले, केशव तात्याबा वाघ, तुळशीराम परशुराम घाडगे, तानाजी नारायण वाघ हे तीनपानी पत्त्यांचा जुगार खेळत असताना आढळले.
जुगार खेळण्यासाठी तानाजी नारायण वाघ (रा. ताथवडा, ता.फलटण, जि. सातारा) यांनी त्यांच्या मालकीच्या सागर ढाबा सुरू होता. त्यामुळे सागर ढाबाचे मालक तानाजी नारायण वाघ यांच्यासह 9 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छाप्यामध्ये जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोटारसायकली व मोबाईल असा एकूण 3 लाख 83 हजार 9 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अधिक तपास हवालदार एस. जी. शिंदे करीत आहेत.