दहिवडी | माण तालुक्यातील कुडवाड गावच्या हद्दीतील माळवस्ती येथील ओढ्याच्या कडेला असलेल्या तीन पानी जुगार अड्डयावर म्हसवड पोलिसांनी छापा टाकून सुमारे 1 लाख 14 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला असून चौघांना अटक करण्यात आली आहे. सुभाष भिकू सूर्यवंशी (वय – 41), नितीन अरुण तुपे (वय – 30, रा. कुडवाड), आप्पा शंकर जानकर (वय – 65), प्रविण गोपीचंद शेलार (वय – 45, सर्व रा. मानेवाडी – कुडवाड, ता.माण), अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मानेवाडी (कुडवाड) येथील माळवस्तीच्या शिवारात ओढ्याच्या कडेला प्रविण गोपीचाद शेलार (रा. मानेवाडी (कुडवाड) ता. माण) हा बेकायदा तीन पानी जुगार चालवत असल्याची माहिती म्हसवड पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पथक तयार करुन छापा टाकला.
दरम्यान, एका झाडाच्या कडेला पाचजण तीन पानी पत्त्याचा जुगार खेळत असल्याचे दिसून आले. पोलिस आल्याची चाहूल लागताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यातील सुभाष सूर्यवंशी, नितीन तुपे, आप्पा जानकर, प्रविण शेलार या चौघांना पोलिसांनी पकडले तर युवराज शंकर शेलार (रा. कुडवाड) पळून गेला.