औरंगाबाद : केंद्रीय मंत्रिमंडळात रावसाहेब दानवे यांना एका अर्थाने बढती मिळाली आहे. रेल्वे मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या खात्याच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आहे. त्यांच्या या बढतीमुळे मराठवाडा आणि एकूणन महाराष्ट्रातील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील म्हणजेच पर्यायाने मराठवाड्यातील रेल्वेचे प्रलंबीत प्रश्न मार्गी लागण्याची आशा वाढली आहे.
रेल्वेच्या बाबतीत महाराष्ट्राचे दोन भाग झाले आहेत. त्यात मुंबई आणि उपनगरील रेल्वेची स्थिती आणि विकास झपाट्याने झाला असला तरी मराठवाडा आणि विदर्भात अद्यापही हव्या त्या सुविधा मिळालेल्या नाही. मराठवाड्यातील रेल्वेचा प्रश्न तर अत्यंत गंभीर आहे. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे मराठवाड्याचा मध्य रेल्वेत समावेश करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. त्यात मधल्या काळात पीयुष गोयल यांच्या रुपाने महाराष्ट्राचा रेल्वेमंत्री असला तरी हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. विशेष म्हणजे या प्रश्नासाठी नुकतेच अर्थराज्य मंत्री झालेले डॉ. भागवत कराड हे आग्रही होते. त्यात अजूनही नाशिक ते परभणी या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण किंवा विद्युतीकरणाचे काम रखडलेले आहे.
मराठवाड्याचा विकास करायचा असेल तर रेल्वेचा विकास महत्त्वपूर्ण आहे. जालना–मुंबई जनशताब्दी एक्सप्रेसचा विस्तार नांदेडपर्यंत करण्याची मागणीही प्रलंबीत आहे. परभणी आणि नांदेड मधील नागरिकांनी तशी मागणी केली आहे. पूर्ण येथे ट्रेनिंग सेंटर सुरू करण्याची मागणीही करण्यात आलेली आहे. लातूरमध्ये पीटलाईनचे काम मंजूर करण्यात आलेले आहे या कामाला गती देण्याचीही आवश्यकता आहे.
हे सर्व प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबीत आहे. पीयुष गोयल रेल्वेमंत्री असतांना हे सर्व प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. यातील काही कामांना त्यांच्या कार्यकाळात मंजूरी देखील देण्यात आली आहे. मात्र, आता मराठवाड्याचा हक्काचा व्यक्ती राज्यमंत्री पदावर विराजमान झाला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मराठवाड्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत