मुंबईकरांनो तुमच्यासाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही जर उद्या मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल ट्रेननं प्रवास करणार असाल तर ही बातमी नक्की तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण अभियांत्रिकी कामासाठी उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
या मेगाब्लॉकदरम्यान, रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटं उशिराने धावणार आहे. उद्या मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वेसह हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे उद्या आपल्या कामाचे नियोजन या ब्लॉकच्या वेळा बघूनच घरा बाहेर पडा म्हणजे तुमची गैरसोय होणार नाही.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ११.३० ते दुपारी ३.३०ब्लॉक वेळेत अप आणि डाउन मार्गावरील जलद लोकल अप आणि डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही लोकल विलंबाने धावतील.
हार्बर रेल्वे
हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सकाळी ११.१० ते सायं ४.१० या वेळेत ब्लॉक घेतला जाणार आहे. अप आणि डाऊन मार्गांवर असेल. परिणामी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी / बेलापूर / पनवेलदरम्यान अप आणि डाउन मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे. सीएसएमटी ते कुर्ला आणि कुर्ला ते पनवेलदरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वेमार्ग
पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या वेळेत अप आणि डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक असेल. परिणामी ब्लॉक वेळेत अप आणि डाउन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. चर्चगेट येथे जाणाऱ्या काही फेऱ्या वांद्रे आणि दादर स्थानकापर्यंतच धावणार आहेत. त्याच स्थानकातून त्यांचा परतीचा प्रवास सुरू होईल. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावतील.