गुड न्यूज! रेल्वे स्टेशन तिकीट काऊंटर आजपासून सुरु, एजंटद्वारेही बुकिंग सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी १ जूनपासून २०० रेल्वे चालवणार आहे. यासाठी प्रवाशांना ऑनलाईन तिकीट बुकिंगसोबत आता रेल्वे तिकीट काऊंटर आणि एजंट द्वारेही बुकिंग करता येणार आहे. याव्यतिरिक्त, कॉमन सर्व्हिस सेंटरला ही रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिली आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाने एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार रेल्वे मंत्रालयाने सर्व झोनच्या जनरल व्यवस्थापकांना आज शुक्रवारपासून बुकिंग काऊंटर सुरू करण्यास सांगितले आहे. रेल्वे मंत्रालयाने सर्व जनरल व्यवस्थापकांना गरजेनुसार आरक्षण काउंटर कुठे उघडायचे ते ठरविण्यास सांगितले आहे. तथापि, रेल्वेने स्पष्ट केले आहे की कामगार गाड्यांच्या प्रवाशांचे नियंत्रण अद्याप संबंधित राज्यांच्या ताब्यात राहील.

शुक्रवारी देशभरातील जवळपास १.७ लाख ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’वर रेल्वेचे तिकिटांचे बुकिंग पुन्हा सुरु केले जाईल, असे केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’ ही ग्रामीण आणि दुर्गम ठिकाणी सरकारची ई-सेवा देणारी केंद्रे आहेत. ही केंद्रे अशा ठिकाणी आहेत जिथे संगणक आणि इंटरनेटची उपलब्धता कमी किंवा नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत काउंटरवरील काही स्थानकांवरही बुकिंग सुरु होईल, असेही रेल्वे मंत्र्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, तिकीट बुकींगसाठी आरक्षित खिडक्या किती खुल्या करायचा याचा निर्णय राज्यांनी घ्यायचा असल्याचंही रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

भारताला सामान्य परिस्थितीकडे घेऊन जाणं आवश्यक आहे. त्यासाठी आणखीन काही रेल्वे परत सुरू करण्यासंबंधी लवकरच घोषणा केली जाईल, असं रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलंय. रेल्वे बोर्डानं दिलेल्या आदेशामध्ये, २२ मेपासून सामान्य सेवा केंद्रात (CSC) तिकीट आरक्षण काऊंटर उघडले जाऊ शकतील. ज्या स्टेशनवर तिकीट काऊंटर उघडले जाऊ शकतील, अशा स्टेशनची यादी झोनल रेल्वेकडून लवकरच जाहीर केली जाईल. या स्टेशन्सवर तिकीट काऊंटर उघडण्यासाठी प्रोटोकॉलही बनवण्यात येईल. त्यानंतर आणखी रेल्वे चालवण्याची घोषणा करू, असं पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे.

लवकरच आणखी गाड्यांची घोषणा
१ मेपासून श्रमिक स्पेशल गाड्या सुरु केल्यापासून रेल्वेने २,०५० गाड्या चालवल्या असून सुमारे ३० लाख प्रवासी, विद्यार्थी आणि इतर अडकलेल्या लोकांची वाहतूक केली गेली आहे. रेल्वेमंत्र्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे कामगार-विशिष्ट गाड्या चालविण्यात रेल्वेला मदत केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आणि सहकार्य न केल्याबद्दल पश्चिम बंगाल आणि झारखंडवर टीका केली. आतापर्यंत पश्चिम बंगालमध्ये केवळ २७ रेल्वे गाड्या धावू शकल्या आहेत आणि आठ आणि नऊ मेपर्यंत तेथे फक्त दोन गाड्या पोहोचू शकल्या आहेत. झारखंडमध्ये ९६ गाड्या चालविण्यात आल्या असून राजस्थानमध्ये आतापर्यंत ३५ गाड्या धावल्या गेल्या आहेत, अशी माहिती पियुष गोयल यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment