हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी ओडिसा मध्ये झालेल्या रेल्वे अपघातात 275 जणांचा मृत्यू तर हजारहून अधिकजण जखमी झाले. या भीषण अपघाताने संपूर्ण देश हळहळला आहे. या घटनेमध्ये मृत पावलेल्या आई-वडिलांच्या पाल्यांचं काय होणार हा प्रश्न निर्माण झाला. त्या निष्पाप जीवांचा सांभाळ कसा होणार हा प्रश्न उद्भवत आहे. या अपघातामुळे रेल्वे प्रवासातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर तर आलाच परंतु लोकांना रेलवेच्या 10 लाख रुपयांच्या विम्याचीही आठवण झाली. चला आज आपण जाणून घेऊया रेल्वेची हि विमा योजना नेमकी काय आहे आणि त्याचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागत.
IRCTC कडून रेल्वे तिकीट ऑनलाईन बुक करत असताना विमा काढण्यासाठी पर्याय दिला जातो. या पर्यायातून 35 पैशांमध्ये दहा लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण देण्याची तरतूद आहे. पण बऱ्याच लोकांना याबाबत माहिती नाही आणि काहीजण तर या विम्याची दखल सुद्धा घेत नाही. खरंतर प्रत्येक प्रवाशाला तिकीट खरेदी करताना हा विमा घेणे आवश्यक आहे. जर हा विमा तुम्हाला घ्यायचा असेल तर तिकीट काढतानाच अर्ज करावा लागतो. यावेळी तुम्हाला फक्त 35 पैसे द्यावे लागतात. यानंतर IRCTC तुम्हाला दहा लाख रुपयांपर्यंतचे विमा कव्हर देते. प्रत्येक प्रवाशाने तिकीट खरेदी करताना हा विमा घेणे आवश्यक आहे.
असा घ्या विम्याचा लाभ –
खरं तर माणसाचा मृत्यू पैशाने भरून निघू शकत नाही हे खरच आहे, परंतु चुकून म्हणा किंवा दुर्दैवाने रेल्वे अपघातात मृत्यू झाल्यास हा विमा तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे हा विमा घेतल्यावर तिकीट बुक होताच तुम्हाला ईमेल आणि SMS द्वारे डॉक्युमेंट फॉम मध्ये कागदपत्र तुम्हाला पाठवण्यात येतात. ते ओपन करून नॉमिनी असलेल्या व्यक्तीचे तपशील तुम्हाला भरावे लागतात. जर रेल्वे अपघात झाला, तर नॉमिनी या विम्याचा दावा करू शकतात. यासाठी तुम्हाला विमा कंपनीच्या जवळच्या कार्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतात.
किती रुपये मिळतात –
रेल्वेच्या विमा पॉलिसीनुसार, एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाला किंवा तो कायमचा अपंग झाल्यावर त्याला दहा लाख रुपये पर्यंतचा विमा दिला जातो. जर प्रवासी अंशतः अपंग झाला तर नुकसान भरपाई म्हणून 7.5 लाख रुपये दिले जातात. जर प्रवाशाला गंभीर दुखापत झालेली असेल तर दोन लाख रुपयांची मदत केली जाते. एवढंच नाही तर किरकोळ दुखापतींसाठी प्रवाशांना 10 हजार रुपये दिले जातात.