मुंबईत रेल्वेने उघडले पहिले पॉड हॉटेल, भाडे फक्त 999 रुपये; त्याविषयी आणखी तपशील जाणून घ्या

मुंबई । भारतीय रेल्वेने पहिल्यांदाच पॉड हॉटेल लाँच केले आहे. मुंबई सेंट्रल स्टेशनवर अशा प्रकारचे पहिले पॉड हॉटेल सुरू झाले आहे. विशेष म्हणजे रेल्वे प्रवाशांसोबतच आता सर्वसामान्यांनाही तुलनेने स्वस्त दरात आधुनिक सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या पॉड हॉटेलमध्ये वाय-फाय, टीव्ही, एक छोटा लॉकर, आरसा आणि रीडिंग लाइट इत्यादी उपलब्ध करून देण्यात येतील. अशा सुविधा असलेल्या या पॉड हॉटेलमध्ये राहण्यासाठी 12 तासांसाठी 999 रुपये आणि 24 तासांसाठी 1,999 रुपये मोजावे लागतील.

पॉड हॉटेल काय आहे ?
पॉड हॉटेलमध्ये अनेक लहान बेड असलेल्या कॅप्सूल आहेत आणि प्रवाशांना रात्रभर परवडणारी राहण्याची सोय आहे.

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते उद्घाटन
भारतीय रेल्वेच्या पहिल्या पॉड हॉटेलचे बुधवारी दक्षिण मुंबईतील चर्चगेट स्थानकावरून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. व्हिडीओ लिंकद्वारे विविध प्रवासी सुविधांचे उद्घाटनही केले.

कार्यक्रमात दानवे म्हणाले की,”या पॉड-कॉन्सेप्ट हॉटेलमध्ये प्रवाशांना माफक दरात राहण्याची सुविधा मिळणार आहे. पॉड हॉटेलला कॅप्सूल हॉटेल म्हणूनही ओळखले जाते. चर्चगेट स्थानकावरील रेल्वे सार्वजनिक तक्रार कार्यालयाचे उद्घाटनही त्यांनी यावेळी केले.”