Monday, January 30, 2023

पाऊस वाढला : कोयना धरणाचे दरवाजे उचलणार, उद्या 10 हजार क्युसेस पाणी सोडणार

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या पाटण तालुक्यातील कोयनाधरणात पावसाचा जोर वाढलेला असून विक्रमी पावसाची नोंद होत आहे. धरण क्षेत्रात 9 तासात 6. 13 टीएमसी पाणीसाठा वाढला असून आज दि. 22 सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 72. 88 टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे धरणातून शुक्रवारी सकाळी 10 वाजता 10 हजार क्युसेस पाणी सोडण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला आहे.

- Advertisement -

कोयना धरणाची पाणी पातळी 2133 फूट 2 इंच झाली असून धरणामध्ये 72.88 TMC पाणीसाठा झाला आहे. धरणाची सांडवा पातळी 2133 फूट 6 इंच असून या पातळीस पाणीसाठा 73.18 TMC आहे. पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे कोयना धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. पाणलोट क्षेत्रामधून पाण्याची आवक वाढल्यास विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

कोयना नदीवरील अनेक पूल हे पूराच्या पाण्याखाली गेलेले आहेत. पावसाच्या मुसळधार कोसळण्याने कोयना परिसरासह पाटण, कराड तालुक्यातील नदीच्या पात्राबाहेर पाणी आलेले आहे. त्यातच उद्या सकाळी पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याने पूरस्थिती निर्माण होणार आहे. प्रशासनाने या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच नदीकाठी असलेल्या कुटुंबियांचे स्थलांतर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.