हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील ४ दिवसात मुसळधार पावसामुळे पुणे शहरात अगदी भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक सखल भागात पाणी साचल्याने सर्वसामान्य माणसाचे जीवन विस्कळीत झालं होते. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील एकूण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पुण्याचा दौरा केला. यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील महायुती सरकारवर संताप व्यक्त केला. जर कोणतीही पूर्वसूचना न देता जर पाणी सोडलं असेल आणि यामुळे जर नुकसान झालं असेल तर मग राज्य सरकारने यात लक्ष देणे गरजेचे आहे असं राज ठाकरे यांनी म्हंटल.
राज ठाकरे म्हणाले, मी गेल्या अनेक वर्षांपासून सांगतो की मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला. पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही. त्याचेच हे सर्व चित्र आहे. राज्य सरकारकडून प्रत्येक वेळेला डेव्हलपमेंट प्लॅन येतो. पण टाऊन प्लॅनिंग नावाची काहीही गोष्ट नसते. किती गाड्या येतात, किती विद्यार्थी येतात, लोक राहणार कसे याचं काहीही प्लॅनिंग नसतं. त्यामुळे ही शहर अशीच नष्ट होत जाणार, हे कधीही थांबणार नाही. केवळ एका अधिकाऱ्याने निलंबन करुन हा प्रश्न सुटणार नाही असं राज ठाकरे यांनी म्हंटल. राज्य सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना स्वतः लक्ष घालावं लागणार आहे. माजी नगरसेवकांनी नीट जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. आपापसातले हेवेदावे बाजूला ठेवून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र बसले तर हा प्रश्न सुटेल. कोण्या एकट्या पक्षाच हे काम नाही.
अजित पवारांना टोला –
यावेळी राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनाही टोला लगावला. ज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत, एक तर पुण्यातीलच आहेत. ते या ठिकाणी नसतानाही धरणातून पाणी वाहिलंय. त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला नको का? असा टोला राज ठाकरेंनी अजितदादांना लगावला. गेले दोन तीन वर्ष केंद्र सरकार महापालिकेच्या निवडणुका घेत नाही. इथे नगरसेवक नाही. निवडणुका लागतील तेव्हा आमदारांबद्दल ठरवलं जाईल. त्यामुळे ही जबाबदारी घेणार कोण, प्रशासनाशी बोलायचं कोणी? असे एकामागून एक सवाल राज ठाकरेंनी केले. तसेच पुण्यातील एकूण परिस्थितीवरून चिंता व्यक्त केली.