Raj Thackeray Post On Balasaheb Thackeray : बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी राज ठाकरेंची खास पोस्ट; कोणाचे कान टोचले??

Raj Thackeray Post On Balasaheb Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Raj Thackeray Post On Balasaheb Thackeray । हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज १३ वा स्मृतिदिन आहे. या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हे स्मृतिस्थळी जाऊन बाळासाहेबांना अभिवादन करत आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे देखील बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्यासोबत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दाखल झाले आणि आदरांजली वाहिली. यापूर्वी राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत बाळासाहेब ठाकरेंबद्दल यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

काय म्हणाले राज ठाकरे? Raj Thackeray Post On Balasaheb Thackeray

शिवसेना पक्षाचे संस्थापक, हिंदुहृदयसम्राट आणि माझे काका स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एका राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब. आणि पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता पक्षाचा कमंडलवाद फोफावायच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारे बाळासाहेबच.

पण म्हणून बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून नाही पाहिलं. त्यांच्यासाठी हा विषय अस्मितेचा होता, धर्माप्रतीच्या प्रेमाचा होता. आणि हे करताना बाळासाहेबांनी, प्रबोधनकारांकडून आलेला तर्कवाद पण सोडला नाही. बाळासाहेब हे कमालीचे हिंदुप्रेमी होते, पण म्हणून त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती लोप पावली नाही. त्यामुळे बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा त्यावर मतं मागणाऱ्यांची गंमत वाटते. ना त्यांना बाळासाहेब माहित आहेत, ना त्यांना प्रबोधनकार माहित आहेत, ( अर्थात ऐकणं आणि वाचणं यांचा दुष्काळ असल्यामुळे ) त्यामुळे त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची झालेली मशागत किती समृद्ध होती ह्या पुसटशी देखील कल्पना नाही ! Raj Thackeray Post On Balasaheb Thackeray

फक्त मतं, सत्ता मिळवणे आणि ती सत्ता मिळाल्यावर वाट्टेल तसं ओरबाडणं म्हणजे राजकारण हे रूढ होत असताना, समाजकारण आधी आणि मग राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन !

संजय राऊतही प्रोटोकॉल तोडून शिवाजी पार्कवर

दरम्यान, आज शिवसेनेची बुलंद तोफ, खासदार आणि मातोश्रीचे निष्ठावान म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत हे सुद्धा बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कवर दाखल झाले. खरं तर संजय राऊत मागील काही दिवसापासून एका गंभीर आजाराने त्रस्त आहेत. तरीही ते आज बाळासाहेब ठाकरेंसाठी शिवाजी पार्कवर आले. संजय राऊत यांच्यासोबत त्यांचे बंधू आणि विक्रोळीचे आमदार सुनील राऊत सुद्धा होते. संजय राऊत यांनी तोंडाला मास्क लावला होता. त्यांचं शरीर थकलेलं वाटत होत. मात्र तरीही त्यांनी बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क गाठलं. हा क्षण शिवसैनिकांसाठी अतिशय भावनिक असा क्षण होता.