हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यामध्ये लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी संपल्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांनी कंबर कसली आहे. परंतु मनसे पक्षाने ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची (Raj Thackeray) मनधरणी करण्यासाठी भाजप नेते प्रसाद लाड आणि आमदार निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) त्यांच्या भेटीला गेले होते. या भेटीनंतरच मनसे निवडणूक लढवणार नसल्याची माहिती नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) यांनी दिली आहे. त्यामुळे आता भाजपचा एक मार्ग मोकळा झाला आहे.
माध्यमांशी बोलताना नितीन देसाई यांनी सांगितले की, “3 तारखेला देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली होती. यानंतर पुन्हा त्यांची दोनदा चर्चा झाली. त्यावेळी, देवेंद्र फडणवीसांनी वैयक्तिक विनंती केली की विधानपरिषद निवडणुकीच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपने डावखरेंना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अभिजीत पानसेंनी माघार घ्यावी. फडणवीसांच्या विनंतीचा मान राखतच राज ठाकरेंनी निर्णय घेतला आहे की, अभिजीत पानसे अर्ज भरणार नाहीत “
त्याचबरोबर, “कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेने भाजपला पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे यांनी फडणवीस यांना सांगितले आहे की, अशी गोष्ट वारंवार होणार नाही. कारण आमचाही स्वतंत्र पक्ष आहे. राजकारणात बऱ्याच गोष्टी घडत असतात, ज्याचा पक्षाला होणारा फायदा कालांतराने दिसतो. निवडणुकीची तयारी खूप चांगली झाली होती. मात्र फडणवीसांच्या विनंतीला मान देत माघारीचा निर्णय घेतला. पक्षाला याचा फायदा नजीकच्या काळात दिसेल” असेही नितीन देसाई यांनी माहिती दिली.
दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतरच कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजीत पानसे यांना मनसेने उमेदवारी जाहीर केली होती. तसेच या निवडणुकीसाठी मनसेने पूर्ण तयारीही केली होती. त्यामुळेच या निवडणुकीत मनसे आणि भाजप सामना सामना होईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात होते. परंतु आता देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीनंतर राज ठाकरेंनी कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेतली आहे.