‘त्या’ ऑडिओ क्लिपमुळे राजस्थानमधील राजकारणात खळबळ

जयपूर । राजस्थानमध्ये राज्य सरकारवरील अस्थिरतेचं संकट अद्यापही कायम असून रोज नाट्यमय घडामोडी घडत आहेत. याचदरम्यान एका ऑडिओ क्लिपमुळे राजस्थानमधील राजकारणात खळबळ माजली आहे.गुरुवारी एक धक्कादायक ऑडिओ क्लिप प्रसारमाध्यमांमधून समोर आली. यामध्ये केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, भाजपा नेते संजय जैन आणि काँग्रेस आमदार भवरलाल शर्मा राजस्थान सरकारमधील आमदारांसंबंधी बोलत आहेत. आमदार भवरलाल शर्मा आणि विश्वेंद्र सिंह यांचं प्राथमिक सदस्यत्व काँग्रेस पक्षाकडून रद्द करण्यात आलं आहे. पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. संजय जैन आणि भवरलाल शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेसकडून रणदीप सूरजेवाला यांनी केली आहे. तसेच आमदारांना देण्यासाठी काळा पैसा कुठून आणला याचाही तपास झाला पाहिजे असं सूरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं.

रणदीप सूरजेवाला यांनी ऑडिओ क्लिपसंबंधी बोलताना केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्यावर जोरदार टीका केली. “राजस्थानमधील सरकार पाडण्याच्या षडयंत्रात सहभागी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्यावर स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपकडून (SOG) एफआयर दाखल केला पाहिजे. गरज लागल्यास त्यांना अटकही करावी,” असं त्यांनी म्हटलं आहे. “दिल्लीत बसून राजस्थानमध्ये आमदारांचा घोडेबाजार कोण करतंय हे समोर आलंच पाहिजे,” अशी मागणी यावेळी रणदीप सूरजेवाला यांनी केली आहे. दरम्यान सचिन पायलट यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असंही ते म्हणाले आहेत.

काय आहे ऑडिओ क्लिप प्रकरण?
एका स्थानिक वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये राजस्थामधील काँग्रेसचे आमदार भवरलाल शर्मा यांनी ३० आमदारांची संख्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं असल्याचं सांगितलं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे एक नाही तर ३ ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत ज्यामध्ये पैशांची चर्चा असल्याचाही दावा आहे. भवरलाल जेव्हा पैशांसंबंधी विचारतात तेव्हा समोरील व्यक्ती जे आश्वासन दिलं आहे ते पूर्ण केलं जाईल आणि वरिष्ठतेसंबंधीही काळजी घेतली जाईल असं सांगत आहे. याआधी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीदेखील घोडेबाजार केला जात असून आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा केला आहे. दरम्यान भवरलाल शर्मा यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला असून हे काँग्रेस सरकारचं षडयंत्र असून आपल्या आमदारांवर दबाव आणण्यासाठी हे सर्व केलं जात असल्याचा आरोप केला आहे.