हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात नवीन माहिती पुढं आली असून यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या आमदारकी वर टांगती तलवार उभी राहिली आहे. राजू शेट्टी यांचे नाव वगळल्याची चर्चा समोर येत होती. यावर विचारले असता शेट्टी यांनी रोखठोक प्रतिक्रिया देत राज्यपालांनी जो निर्णय घ्यायचा तो घ्यावा, मला फरक पडत नाही अस म्हंटल.
राजू शेट्टी म्हणाले, मला यात फारसा रस राहिलेला नाही, तसेच मी याबाबतचा पाठपुरावाही केला नाही. त्यामुळे राज्यपालांनी जो निर्णय घ्यायचा तो घ्यावा, मला फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कदाचित ईडी आणि इनकम टॅक्सची धाड न पडल्यानेच मला संधी दिली नसावी असे राजू शेट्टी म्हणाले.
राज्यपाल नियुक्त आमदार निवडीतून तांत्रिक कारणामुळे शेट्टी यांना वगळण्यात आल्याच्या वृत्ताने स्वाभिमानी शेतकरी संघटनेत अस्वस्थता पसरली आहे. पूरग्रस्तांना न्याय देण्याच्या मागणीसाठी शेट्टी यांचे सध्या आंदोलन सुरू आहे. थेट राज्य शासनाविरोधात त्यांनी दंड थोपटल्याने महाविकास आघाडीमध्ये नाराजीचा सूर असताना, राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या यादीतून डच्चू मिळाल्याने महाविकास आघाडी आणि शेट्टी यांच्यातील संबंध ताणल्याचे दिसत आहे.