हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन Ram Sutar Passes Away । एक दुःखद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचं निधन झालं आहे. वयाच्या 101 व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला आहे. राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे असे शिल्पकार होते. भारतीय शिल्पकलेला जागतिक ओळख त्यांनी मिळवून दिली होती. जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून ओळखला जाणारा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ (सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा) राम सुतार यांनीच साकारला होता. आज त्यांच्या निधनाने भारताने मोठं व्यक्तिमत्व गमावले आहे.
११ वाजता अंत्यसंस्कार होणार – Ram Sutar Passes Away
राम सुतार यांच्या पार्थिवावर आज सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. सरकार कडून राम सुतार यांच्या कलेबद्दल त्यांचा पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीच राम सुतार याना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः रुग्णालयात त्यांची भेट घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला होता. त्यावेळी राम सुतार यांनी महाराष्ट्र अभिमान गीत देखील गायले होते. राम सुतार यांनी संसदेतील महात्मा गांधींचा पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आणि अनेक ऐतिहासिक स्मारके आपल्या कौशल्याने जिवंत केली. राम सुतार यांच्या पुतळ्यामधली कलाकुसर, त्यांच्या शिल्पामधली बारकाई हे त्यांच्या कलेचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या निधनामुळे कला क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे. Ram Sutar Passes Away
राम सुतार यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1925 रोजी धुळे जिल्ह्यातील गोंडूर या गावात झाला. सुरुवातीच्या काळात त्यांनी श्रीराम कृष्ण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पकलेचे प्राथमिक धडे घेतले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिक्षण पूर्ण केले. 1959 साली राम सुतार यांनी दिल्लीत माहिती व दूरसंचार मंत्रालयात नोकरी स्वीकारली. मात्र काही वर्षांनंतर त्यांनी नोकरीचा राजीनामा देत पूर्णवेळ शिल्पकार म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. शिल्पकलेतील अनुभवाच्या जोरावर त्यांनी दिल्लीमध्ये स्वतःचा स्टुडिओ उभारला.त्यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर अनेक ऐतिहासिक पुतळे उभारले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीची डिझाईन राम सुतार यांनीच बनवली होती. भारतीय कला आणि संस्कृतीच्या जडणघडणीत त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.




