Ramadan 2025| इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र महिना रमजान 2025 हा 28 फेब्रुवारीच्या संध्याकाळी सुरू होण्याची शक्यता आहे. परंतु चंद्रदर्शनानुसार तारखांमध्ये थोडा फरक पडू शकतो. रमजान महिना प्रार्थना, आत्मशुद्धी आणि समाजसेवेसाठी समर्पित असतो. जगभरातील मुस्लिम समाज या काळात उपवास (रोजा) करतात, तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करतात.
रमजानचा अर्थ आणि महत्त्व (Ramadan 2025)
रमजान हा केवळ उपवास करण्याचा काळ नाही तर मानसिक आणि आत्मिक शुद्धीचा महिना असतो. याकाळात सूर्योदयापूर्वी ‘सहरी’ करून उपवास सुरू केला जातो आणि सुर्यास्तानंतर ‘इफ्तार’सह तो संपवला जातो. दिवसभर अन्न-पाण्याचा त्याग करून संयम, त्याग आणि ईश्वरभक्तीचा अनुभव घेतला जातो. या महिन्यात दानधर्म आणि गरजूंना मदत केली जाते.
भारतात रमजानची सुरुवात आणि समाप्ती
मध्यपूर्वेत चंद्रदर्शन झाल्यानंतर भारतात रमजान साधारणतः एक दिवस उशिरा सुरू होतो. त्यामुळे भारतात हा महिना 1 मार्च 2025 पासून सुरू होण्याची शक्यता आहे. 30 दिवसांच्या उपवासानंतर, 31 मार्च रोजी ईद-उल-फित्रचा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जाणार आहे. मात्र, स्थानिक चंद्रदर्शनाच्या आधारे तारखा बदलू शकतात.
ईद-उल-फित्र(Ramadan 2025)
रमजान संपल्यानंतर ईद-उल-फित्र मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. हा दिवस उपवासाची समाप्ती आणि नवीन प्रारंभाचे प्रतीक मानला जातो. मुस्लिम समाजातील लोक नवीन वस्त्र परिधान करून सकाळी विशेष ‘ईद नमाज’ अदा करतात. यादिवशी ‘शिरखुर्मा’ आणि इतर पारंपरिक पदार्थ बनवले जातात. तसेच, कुटुंबांना, मित्रांना शुभेच्छा दिल्या जातात.