हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ramdara Temple) आपल्या महाराष्ट्रात अनेक सुंदर मंदिर आहेत. जिथे कायम भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळते. काही दिवसांपूर्वी आयोध्येत श्रीराम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. या मंदिराचे सौंदर्य आणि पावन परिसर भाविकांसाठी प्रमुख आकर्षण बनले. मात्र अयोध्येला जाऊन श्रीरामाचे दर्शन घेणे प्रत्येक सामान्य नागरिकाला शक्य नाही. असे असताना आज आम्ही तुम्हाला श्रीरामाच्या एका अशा मंदिराबद्दल सांगणार आहोत ज्याचे सौंदर्य डोळ्यात साठवून घ्यावे इतके सुंदर आणि त्याचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. हे मंदिर पुण्यापासून अगदी जवळ आहे. ज्याला ‘रामदरा मंदिर’ म्हणून ओळखले जाते.
कुठे आहे रामदरा मंदिर? (Ramdara Temple)
पुणे- सोलापूर महामार्गावर पुण्यापासून केवळ ५० किलोमीटर अंतरावर लोणी काळभोर या गावात हे मंदिर आहे. या मंदिराला ‘रामदरा मंदिर’ म्हणून ओळखले जाते. पुण्यातून महामार्गावरून गेल्यानंतर पश्चिम घाटाच्या पायथ्याशी हे मंदिर वसलेले आहे. या मंदिराच्या तिन्ही बाजूंनी पाणी आणि सुंदर टेकड्यांनी समृद्ध असा परिसर दिसून येतो. जो भाविकांच्या मनाला अगदी मोहून टाकतो. रामदरा मंदिर हे लोणी जवळील अत्यंत प्राचीन मंदिर असून या मंदिरात कायम भाविकांची मोठी गर्दी असते.
रामदरा मंदिर कोणी बांधलं?
खूप काळापूर्वी हे मंदिर अत्यंत उध्वस्त अवस्थेत होते. जे पाहून धुंडी बाबांनी स्थानिक लोकांच्या मदतीने १९७० मध्ये या मंदिराची पुनर्रचना केली. तेव्हा बांधलेलं हे मंदिर आजही जसंच्या तसं आहे. (Ramdara Temple) अर्थात हे मंदिर धुंडी बाबांनी बांधलं आहे. या ठिकाणी मुख्य मंदिर महादेवाचे आहे. मात्र प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या मोहक मुर्त्यांमुळे हे मंदिर प्रसिद्ध आहे.
असं म्हणतात की, या मंदिरात असलेले शिवलिंग हे स्वतः धुंडी बाबांनी तयार केले आहे. या मंदिराशेजारी श्री देवीपुरी महाराजांचा आश्रम आहे. हे महाराज धुंडी बाबा म्हणून प्रसिद्ध आहेत. या मंदिरात एका नंदीचीदेखील प्रतिमा आहे. (Ramdara Temple) तसेच मंदिराशेजारी दाट झाडी आणि एक सुंदर तलाव आहे. अर्थात मंदिराभोवतालचे वातावरण अत्यंत निसर्गरम्य आणि मनाला मोहित करणारे आहे. या ठिकाणी अनेक पक्षांचा वावर असल्यामुळे त्यांचा आवाज त्यांची किलबिल आपले लक्ष वेधून घेण्यात सक्षम आहेत.
मनमोहक रामदरा मंदिर
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या मंदिराला रामदरा हे नाव प्रभू श्रीरामचंद्रांमुळे पडले आहे. या मंदिराचा परिसर अत्यंत निसर्गरम्य आणि अध्यात्मिक आहे. त्यामुळे मन शांत करायचे असेल तर रामदरा मंदिर हे अत्यंत योग्य ठिकाण आहे. तसेच इथे अत्यंत अद्भुत अनुभूती येते असेही लोकं सांगतात. डोंगराने वेढलेले हे मंदिर दुरून दिसत नाही. मात्र तलावावर शिवाचे मंदिर दिसते आणि प्रवेशद्वाराजवळ असलेला भव्य नंदीसुद्धा आपले लक्ष वेधून घेतो. (Ramdara Temple) इथलं वातावरण आपोआप मनात अध्यात्माची भावना निर्माण करते. या मंदिराच्या आत गेल्यानंतर प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि दत्तगुरूंची अत्यंत सुंदर आणि मनस्वी मूर्ती दिसून येते. शिवाय भिंतीवर विविध देवी देवता आणि संत महात्म्यांच्या मुर्त्या कोरल्याचे देखील दिसते.
पावन उंबराचे झाड
रामदरा मंदिराभोवती असलेली नारळाची आणि ताडाची उंच उंच झाड या मंदिराची शोभा वाढतात, यात काही शंका नाही. (Ramdara Temple) तसेच येथील तलावात कमळाची फुलं आणि त्यावर तरंगणारी बदक मनाला अगदी प्रफुल्लित करतात. या मंदिराच्या सभोवतालचा परिसर स्वर्गाहून सुंदर असल्याचे म्हटले तर आश्चर्य वाटायला नको. तसेच या मंदिराची खास बाब सांगायची म्हणजे, या ठिकाणी सुरुवातीलाच उंबराचे पावन झाड दिसून येते. असं म्हणतात उंबराचे झाड हे श्री दत्तगुरुंचे ध्यानधारणा करण्याचे स्थान आहे. त्यामुळे उंबराच्या झाडाला एक विशेष अध्यात्मिक ऊर्जा आणि अर्थ लाभलेला आहे.
इथे या झाडावर अनेक सुंदर पक्षी जमतात आणि आपापल्या भाषेत ईश्वराचे नामस्मरण करत आहेत, अशी जाणीव होते. रामदरा मंदिर केवळ सुंदर नसून आध्यात्मिक स्थळ आहे. शिवाय या ठिकाणाला प्राचीन वारसा लाभलेला आहे. तसेच या मंदिरात दैवी ताकदीची जाणीव होते आणि त्यामुळे अनेक लोक रामदरा मंदिराला वारंवार भेट देताना दिसतात. (Ramdara Temple)