पुणे प्रतिनिधी | सुनिल शेवरे
‘चित्रपट निर्मितीच्या वेळेस निर्मात्याला अक्षरशः लुटले जाते. चित्रपट सेन्सॉर साठी पाठवायला पण त्याच्या कडे पैसे उरत नाहीत. काही चित्रपट तर ऑस्कर सोडाच पण राष्ट्रीय पुरस्कारा पर्यंतदेखील पोहोचले जात नाहीत’ असे मत जेष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांनी मांडले. डिव्हाईन कॉज सोशल फौंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सहकार्याने बालगंधर्व रंगमंदिर येथे भरलेल्या “आंतरराष्ट्रीय चित्रपट विश्वात मराठी चित्रपटाचे स्थान“ या विषयावर परिसंवादात ते बोलत होते. चित्रपट आणि साहित्याची निर्मिती करणाऱ्यांनी जात, धर्म आणि राजकारण या पासून अलिप्त राहिले पाहिजे तसेच चित्रपट हे मनोरंजनाचे माध्यम असल्यामुळे त्यातून समाज प्रबोधनाची अपेक्षा ठेवु नये” असेही फुटाणे यावेळी म्हणाले.
राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी चित्रपटांनी लौकिक प्राप्त केला आहे. मात्र ‘ऑस्कर’च्या स्पर्धेत अन्य भारतीय चित्रपटांसारखाच मराठी चित्रपट मागे पडतोय. चित्रपटांच्या आंतरराष्टीय व्यवसायात मराठी चित्रपटांना बाजारपेठ कशी मिळवता येईल? माध्यम व्यवसायाचे बदलते स्वरूप व आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब याने मराठी चित्रपटांना जगभर पोहोचवता येऊ शकेल का? कलात्मक नावलौकिका बरोबरच मराठी चित्रपट व्यवसायाचा आर्थिकदृष्ट्या विकास कसा घडवता येईल? आदी विविध विषयांवर परिसंवादा मध्ये दिलखुलास चर्चा झाली. पटकथा हा चित्रपटाचा कणा असतो. पटकथा आणि चित्रभाषा याची योग्य सांगड घातल्यास चित्रपट प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात यावर सर्व तज्ञाचे एकमत दिसून आले.
ऑस्कर च्या परीक्षक समिती मधे ९० टक्के परीक्षक हे अमेरिकन असून वयोमान ६० हून अधिक आहे. त्यांचे सर्वाधिक मत मिळवायचे असल्यास चित्रपटाची निर्मिती त्यांना भावेल अशीच असणं गरजेचं आहे. सब टायटल ब्रिटिश इंग्रजी ऐवजी अमेरिकन इंग्रजी मध्ये हवीत. तांत्रिकदृष्ट्या उत्तम निर्मिती होणे आवश्यक आहे. चित्रपट ऑस्कर साठी पाठवयाचा असल्यास त्यासाठी ची प्रक्रिया जाणून घेणे गरजेचे असल्याचे मत या वेळी उज्वल निरगुडकर यांनी व्यक्त केले.
या मध्ये ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे, ज्येष्ठ तंत्रज्ञ आणि ऑस्कर पुरस्कारांचे परिक्षक उज्ज्वल निरगुडकर, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, ऑस्करपर्यंत पोहोचलेल्या ‘श्वास’चे दिग्दर्शक संदीप सावंत, फॅन्ड्रि चित्रपटाचे निर्माते निलेश नवलखा आणि तारांगण मासिकाचे सम्पादक मंदार जोशी परिसंवादामध्ये सहभागी झाले होते. याप्रसंगी भाजपा कामगार आघाडीचे अध्यक्ष संजय केणेकर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक संजीव पलांडे, निर्माते दिग्दर्शक अनिल काकडे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ पत्रकार राज काझी यांनी केले.