हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ramling Bet) आपल्या महाराष्ट्राला ऐतिहासिक वारसा लाभला आहे हे काही वेगळे सांगायची गरज नाही. नैसर्गिक साधनसंपत्तीसह अनेक ऐतिहासिक वास्तू, प्राचीन प्रार्थनास्थळे, पुरातन मंदिरे आपल्याला महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पहायला मिळतील. यातील बऱ्याच मंदिरांच्या आख्यायिका अगदी चकित करणाऱ्या आहेत. अशाच एका मंदिराविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. ज्या मंदिराला अद्भुत अध्यात्माचा वारसा लाभला आहे. आपण ज्या ठिकाणाविषयी बोलत आहोत ते स्थळ संपूर्ण महाराष्ट्रात रामलिंग बेट नावाने प्रसिद्ध आहे.
कुठे आहे? (Ramling Bet)
महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यामधील बहे गावात कृष्णा नदीकाठी रामलिंग बेट वसले आहे. या नदीच्या मधोमध आजुबाजूला हिरव्यागार परिसरात रामलिंग बेट आहे आणि त्यामुळे येथील सभोवतालचा परिसर अत्यंत नयनरम्य तसाच मनमोहक आहे. या बेटावर असलेल्या श्रीराम मंदिरातून आजूबाजूला वाहणारा नदीचा सुंदर खळखळणारा प्रवाह पाहण्यात विशेष सुख आहे.
मंदिराचे वैशिट्य
या मंदिराचे एक खास वैशिष्ट्य आहे. ते असे की, हे मंदिर ज्या बेटावर आहे ते बेट हनुमानाने आपल्या हाताने पूर रोखल्याने तयार झाले होते. या मंदिरात प्रभू श्रीरामांसह भ्राता लक्ष्मण आणि माता सीता यांच्याही मूर्तीचे पूजन केले जाते. तसेच मठामागे समर्थ रामदासांनी स्थापन केलेली हनुमंताची देखील मूर्ती आहे. (Ramling Bet) येथील अत्यंत लक्षवेधी बाब म्हणजे नदीच्या मध्याभागी असणारे शिवलिंग. यामागे एक आख्यायिका आहे ती जाणून घेऊया.
काय सांगते आख्ययिका?
रामलिंग बेटामागे एक प्राचीन अख्यायिका सांगितली जाते. ती अशी की, प्रभू श्री रामचंद्र आपल्या १४ वर्षांचा वनवास संपवून लंकेहून परतत असताना या ठिकाणी थांबले होते. तेव्हा माता सीता या शेजारी असणाऱ्या शिरटे गावात वास्तव्यास होत्या. (Ramling Bet) दरम्यान, या ठिकाणी विसावले असताना प्रभू श्री रामचंद्रांनी वाळूचे शिवलिंग स्थापन केले आणि त्याची पूजा केली. ते पूजा करत असताना अचानक कृष्णामाईला पूर आला.
हा पूर इतका भयानक होता की, तो अडवण्यासाठी स्वतः हनुमंत प्रभू श्री रामाच्या मागे उभे राहिले. त्यांनी महापूर येत असल्याचे पाहिले आणि आपल्या बलवान बाहूंनी नदीचे पाणी थोपवून धरले. यामुळे नदीचे दोन वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले आणि आपोआपच या ठिकाणी एक बेट तयार झालं. यामुळे गावाचं नाव ‘बाहे’ आणि बेटाचे नाव रामलिंग (Ramling Bet) असे पडले. पुढे जाऊन ‘बाहे’ गावाचे नाव ‘बहे’ असे झाले.
कसे जाल?
मुंबई – बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरुन इस्लामपूर शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर रामलिंग बेट (Ramling Bet) हे सुंदर ठिकाण आहे. या बेटावर जाण्यासाठी तुम्ही स्वतःच्या गाडीचा वापर करू शकता. मात्र मुख्य रस्त्यावर दुचाकी किंवा चारचाकी पार्क करून पुढे जावे लागते. यानंतर बेटापर्यंत उभारण्यात आलेल्या पुलावरुन चालत जाऊन मंदिरात दर्शन घेता येते आणि त्यासह निसर्गरम्य दृश्यांचा अनुभव घेता येतो.