हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साऊथ इंडस्ट्रीमधील एक मोठं नाव आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन (Ramoji Rao Passed Away) झालं आहे. 8 जून 2024 रोजी पहाटे 4 वाजून 50 वाजता त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. उच्च रक्तदाब आणि श्वासोच्छवासाचा त्रास जाणवत असल्याने ५ जूनला त्यांना हैद्राबाद येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. अखेर मृत्यूशी त्यांची झुंज अपयशी ठरली आणि रामोजी राव यांची प्राणज्योत मालवली. रामोजी राव यांच्या निधनाने दक्षिण भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.
रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांना ‘आयकॉनिक मीडिया बॅरन’ आणि ‘फिल्म मोगल’ असं म्हटलं जायचं. त्यांचं पूर्ण नाव चेरुकुरी रामोजी राव होतं. रामोजी राव यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1936 रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला होता. रामोजी फिल्म सिटी आणि ईटीव्ही नेटवर्कचे ते मालक होते. रामोजी राव हे माध्यम विश्वातील एक मोठे व्यक्तिमत्व मानले जातात.आत्तापर्यतच्या त्यांच्या एकूण कामगिरीबद्दल 2016 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
प्रॉडक्शन हाऊस देखील आहे- Ramoji Rao Passed Away
रामोजी राव यांचा एक प्रॉडक्शन हाऊस देखील आहे. ज्याचं नाव ऊषाकिरण मूव्हिज आहे. ऊषाकिरण मूव्हिज बॅनरखाली त्यांनी अनेक सुपरहिट तेलुगू सिनेमे दिले आहेत. रामोजी यांनी जगातील सर्वात मोठे थीम पार्क आणि फिल्म स्टुडिओ, रामोजी फिल्म सिटी बांधलं. मार्गदर्शी चिट फंड, ईनाडू न्यूजपेपर, ईटीव्ही नेटवर्क, रमादेवी पब्लिक स्कूल, प्रिया फूड्स, कालांजली, उषाकिरण मूव्हीज, मयुरी फिल्म डिस्ट्रिब्युटर्स आणि डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स हे त्यांचे व्यवसाय होते. त्यांच्या निधनाने (Ramoji Rao Passed Away) कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.